लाहोर : पाकिस्तानात सुरु असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प परिसरात चिनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला प्रचंड झापलं आहे. खरंतर पाकिस्तानात जाऊन चिनी कर्मचारी आणि सैनिक पाकिस्तानच्या सैनिकांशी हुज्जत घालतात, तेथील स्थानिक कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. मात्र, तरीदेखील चीनने चिनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरुन पाकिस्तानला प्रचंड सुनावलं आहे (China angry on Pakistan over poor security).
पाकिस्तानात कारोट हायड्रोपावर प्रोजेक्ट, आजाद पट्टन प्रोजेक्ट सुरु असलेल्या भागात हवी तशी चिनी कर्मचाऱ्यांना पाकिस्तानकडून सुरक्षा दिली जात नाही, असं चीनचं म्हणणं आहे. सुरक्षेच्या अभावासह कामातही गती नाही. त्यामुळे चीन नाराज असल्याची माहिती मिळत आहे. चीनकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पाकिस्तानकडून पालन होत नसल्याने चीन पाकिस्तानवर प्रचंड भडकला आहे (China angry on Pakistan over poor security).
चीनच्या ओरडण्यावर पाकिस्तान काहीच बोललेला नाही. चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या दडपणाखाली पाकिस्तानी सरकार मूग गिळून गप्प बसलं आहे. मात्र, पाकिस्तानी सरकारच्या या शांततेमुळे पाकिस्तानी सैनिकांचे मनौधैर्य खालावले आहे. त्यामुळे या सैनिकांनी रागात बंडाचं हत्यार उपसलं तर पाकिस्तानी सरकारला प्रचंड महागात पडू शकतं.
हेही वाचा : चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी चीनने आपल्यादेशातील अभियंते, कामगार आणि काही अधिकारी पाकिस्तानात पाठवले आहेत. तिथे स्थानिक मजुरांच्या मदतीने इकोनॉमिक कॉरिडॉरचं काम सुरु आहे. या भागात चीनकडून 500 चिनी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी कामगारांच्या पदावरुन या भागात प्रचंड मोठा वाद उफाळला होता. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानचे सैन्य समारोसमोर आलं होतं.
चिनी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना प्रचंड मारहाण केली होती. मात्र, या प्रकरणावर पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक नाराज आहेत.
चिनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष सुरक्षा पथकाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल इमराम कासिम यांनीदेखील दोन्ही देशांच्या सैनिकांमधील वादावर डोळे झाकले होते. त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांचे मनोबल खालावले आहे. कर्नल इमराम कासिम हे चिनी सैन्यासोबत मिळाले आहेत, असा आरोप पाकिस्तानी सैनिकांनी केला आहे.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या उभारणीसाठी चीनला स्थानिक मजुरांची गरज लागते. पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी चीनला स्थानिक मजूर उपलब्ध करुन देतात. पण ते सर्वसामान्य दरापेक्षा जास्त दरात मजूर उपलब्ध करुन देतात. याबाबत चिनी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती आहे. त्यामुळे चिनी अधिकारी आणि पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. हे मतभेद याआधीदेखील खुलेआम समोर आले आहेत.