कुणाल जायकर टीव्ही 9 मराठी, अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज गावाचे जवान कपील गुंड हे जम्मू काश्मीर येथे शहीद झाले आहेत. गुरूवारी(15 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात ते गंभीररित्या जखमी झाले होते. अखेर त्यांना शनिवारी(17 नोव्हेंबर) वीरमरण आले आहे. सोमवारी अजनूज येथे कपील गुंड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
उधमपूर येथे झालेल्या स्फोटात कपिल आणि त्यांचा सहकारी जवान गंभीर जखमी झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांना वीरमरण आलं. यावेळी ते 24 वर्षांचे होते.
कपील हे जम्मू काश्मीरच्या ओडी सेक्टर बारा कालापहाड येथे गेल्या चार वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा आहे.
विशेष म्हणजे, शहीद जवान कपील गुंडचे वडील निवृत्त सैनिक आहेत. गुंड यांच्या निधनामुळे संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
कपिल गुंड पार्थिव जम्मू काश्मीर येथून विमानाने पुण्यापर्यंत आणलं जाणार आहे. त्यानंतर लष्करी वाहनातून अजनूज येथे आणले जाणार आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता भीमा नदीकाठी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.