पुणे : “ज्यांची ऐपत आहे त्यांनी दहा रुपयांची शिवभोजन थाळी खाऊ नये”, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे (Ajit Pawar on Shivbhojan Thali). “शिवभोजन थाळीची योजना ज्यांच्यासाठी त्यांना याचा लाभ घेऊ द्या आणि ज्यांची ऐपत आहे, त्यांनी 50 रुपयांची राईस प्लेट खावी”, असं आवाहन अजित पवारांनी केलं. पुण्याच्या मावळ तालुक्यात एका हॉटेलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते (Ajit Pawar on Shivbhojan Thali).
“आम्ही गोर गरिबांकरता शिवथाळी योजना सुरु केली. या योजनेसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने रोज एक लाख गरिब लोकांना दहा रुपयात थाळी देण्याचा संकल्प केला आहे. जो रंजलेला, गांजलेला आहे त्याला दहा रुपयात अन्न मिळावं यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे”, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले.
शिवभोजन थाळी योजनेला प्रचंड प्रतिसाद
गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन थाळी योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. या योजनेला सुरु होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. या योजनेला सर्वसामान्य नागरकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शिवभोजन थाळी योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद केली आहे.
योजनेच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष
शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. शिवभोजन केंद्रातून नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. याच उद्देशाने त्यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांनी थेट संवाद साधला होता.
जेवणाबाबत समाधानी आहात का, जेवणाची चव व्यवस्थित आहे का, काही सुचना असल्यास मनमोकळेपणाने सांगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले होते. त्यावर जेवण खुप छान आहे. गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात, अशी प्रतिक्रिया योजनेतील थाळीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या : पुण्यात शिवभोजन थाळीसाठी तुफान गर्दी, रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रधारी पोलीस तैनात