मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे (Maharashtra Budget 2020). राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर अर्थ राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असून या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना महाविकास आघाडी सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत (Maharashtra Budget 2020). राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, गृहनिर्माण धोरण, कृषी सिंचन योजना, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात अंमलबजावणी, कोरोना व्हायरस सारख्या आजारांच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद असावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे.
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. याअगोदर दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात असे. मात्र, आज पहिल्यांदाच सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पानंतर 7 ते 10 मार्च अशी सलग चार दिवसांची सुट्टी अधिवेशनाला राहणार आहे.
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण
दरम्यान, काल (5 मार्च) विधानसभेत राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूटही वाढली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. (Maharashtra Economic Survey Report)
राज्यावर चार लाख 71 हजार 642 कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूली तूट 20 हजार 293 कोटी रुपयांवर, तर वित्तीय तूट 61 हजार 670 कोटींवर गेली आहे. राज्याच्या विकासदरात 5.7 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. तर कृषी आणि संलग्न कार्यांमध्ये 3.1 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.
महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 737 रुपये असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांनंतर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातमी : आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधीमंडळात सादर, कर्जाचा बोजा वाढला, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण