सिडनी (ऑस्ट्रेलिया) : प्रयागराजमधील प्रसिद्ध हनुमान मंदिराचे छोटे महंत योगगुरु आनंद गिरी महाराजांना ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे अटक करण्यात आली आहे. महिलांशी गैरवर्तन आणि मारहाण प्रकरणी आनंद गिरी महाराजांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सिडनीतील सत्संग कार्यक्रमादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप दोन महिलांनी केला. ऑस्ट्रेलियातील माध्यमांच्या माहितीनुसार, 2016 सालापासून हे प्रकरण प्रलंबित होतं.
योगगुरु आनंद गिरी महाराज गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. तिथे ते योग आणि सत्संगाचे कार्यक्रम घेत आहेत. सोमवारी म्हणजे 6 मे रोजी ते भारतात परतणार होते. मात्र रविवारीच म्हणजे 5 मे रोजी दुपारी साडेबारा वाजता आनंद गिरी महाराजांना सिडनी पोलिसांनी अटक केली.
2016 साली सत्संगदरम्यान आनंद गिरी महाराजांनी 29 वर्षीय महिलेशी गैरवर्तन केलं आणि मारहाणही केली. त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये आणखी एक असेच प्रकरण समोर आले. आनंद गिरी महाराजांनी मारहाण केल्याचा आरोप 34 वर्षीय महिलेने केला. या दोन्ही प्रकरणात आनंद गिरी महाराज आरोपी होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
आनंद गिरी महाराज प्रयागराजमधील प्रसिद्ध हनुमान मंदिराचे छोटे महंत आणि निरंजन आखाड्याचे पदाधिकारी आहेत. हनुमान मंदिराचे मोठे महंत आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी आनंद गिरी महाराजांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र गिरी महाराज म्हणाले, “आपली संस्कृती आहे की, शिष्य ज्यावेळी पाया पडतात, त्यावेळी पाठ थोपटली जाते. इथेही तेच झालं. मात्र, महिलेने याला विरोध केला. त्यामुळे आनंद गिरी महाराजांचे शिष्य आणि महिलेमध्ये बाचाबाची झाली. त्यातून मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली. आनंद गिरी महाराज बुधवारी जामिनासाठी कोर्टात जातील.”