‘ज्या दिवशी 12 वा उमेदवार जाहीर झाला, त्याच वेळी त्याला पाडण्याची खेळी…,’ शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Jul 13, 2024 | 3:10 PM

राजकारणात कधीच दोन अधिक दोन चार होत नाही ते कधी पाच कधी सहा देखील होऊ शकते. बरोबर एक वर्षांपूर्वी विधानपरिषद निवडणूकीनंतर राजकारणाचा सारा सारीपाटच बदलला होता. आता राष्ट्रवादी पुरस्कृत जयंत पाटील हरल्याने पुन्हा एकदा वेगळीच चर्चा सुरु झाली आहे...

ज्या दिवशी 12 वा उमेदवार जाहीर झाला, त्याच वेळी त्याला पाडण्याची खेळी..., शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ
shekap leader jayant patil
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे दिग्गज उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना 12 मते मिळून त्यांचा सपशेल पराभव झाला आहे. त्यामुळे राजकारणातील दुढ्ढाचार्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांना दुसऱ्यांदा राजकारणात पराभवाचा धक्का बसला आहे. या प्रकरणात नेहमी इतरांना कात्रजचा घाट दाखविणारे शरद पवार कसे काय क्लीन बोल्ड झाले याची चर्चा आता विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात होणार आहे. त्यातच आता शिवसेना गटाच्या एका नेत्याने दावा केला आहे की ज्या दिवशी 12 वा उमेदवार जाहीर केला तेव्हाच, जयंत पाटील यांचा पराभव होणार ही काळ्या दगडावरील रेघ होती असा दावा केला आहे.

राजकारणात कधी कुणाचा गेम होईल हे सांगता येत नाही. बारामतीचा किल्ला राखण्यात जरी शरद पवार यशस्वी झाले असले तरी त्यांच्या उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी नवाच दावा केला आहे. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही असा आरोप त्यांनी केला आहे. काय म्हणाले आहेत संजय शिरसाठ पाहूयात…

शिंदे गटाने यंदाच्या लोकसभा निवडणूकीत कमी उमेदवार उभे करून जास्त यश मिळविले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूका देखील शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. या लोकसभेत चांगली कामगिरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाची एकीकडे कॉलर टाईट झाली आहे. दुसरीकडे त्यांचे नेते संजय शिरसाठ यांनी दावा केला आहे की ज्यावेळी विधानपरिषदेसाठी 12 वा उमेदवार जाहीर झाला तेव्हाच एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित झाले होते. त्यात शेकापचे जयंत पाटील हरणार हे जवळपास निश्चित झाले होते. कारण उध्दव ठाकरे यांचा मोहरा अनंत गीते यांचा लोकसभेत पराभव झाल्याचे शल्य उद्धव ठाकरे यांच्या वर्मी लागले होते. अनंत गीते यांचा विजय करणे हे शेकापचे जयंत पाटील यांची जबाबदारी होती.

संजय शिरसाठ म्हणाले की ज्या दिवशी बारावा उमेदवार जाहीर केला तेव्हा जयंत पाटील यांचा पराभव निश्चित समजला जात होता. अनंत गीते यांचा पराभव जयंत पाटील यांच्यामुळे झाला होता आणि लोकसभेतील या पराभवाचा वचपा उबाठा गटाला काढायचा होता म्हणूनच जयंत पाटील यांना हरवायचं ठरलं होतं असेही शिरसाठ यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांना धडा शिकवण्यासाठी ही उबाठाची ही खेळी होती असेही संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे.