मुंबई : वाढीव वीज बिलाच्या अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आल्या आहेत (Anil Parab on excess electricity bill). राज्य सरकारने या तक्रारींची दखल घेतली आहे. कुणाचीही वीज कापली जाणार नाही, असं आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं आहे. ग्राहकांचं विज बिलं तपासून पडताळणी केली जाणार असल्याचंदेखील अनिल परब म्हणाले (Anil Parab on excess electricity bill).
अनिल परब यांनी आज (14 जुलै) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये वाढीव वीज बिलाच्या तक्रारींबाबत चर्चा झाली. त्यांच्या चर्चेनंतर अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कुठल्याही ग्राहकाची वीज कापली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात दिलासा मिळेल. ज्यांना वीजबिल जास्त आलं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाई, असं अनिल परब म्हणाले. “वाढीव वीज बिलाच्या तक्रारीचं निवारण करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. अधिकाऱ्यांनी तक्रारींचे निवारण केलं पाहिजे, अशी मागणी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे”, असंदेखील ते म्हणाले.
याआधी काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं 50 टक्के वीज बिल माफ करावं, अशी मागणी केली होती. राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातलं भरमसाठ बिल आलं आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेलं वीज बिल निम्म्याने माफ करावं, असं नाना पटोले म्हणाले होते.
हेही वाचा : लॉकडाऊनमधील 50 टक्के वीज बिल माफ करा, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरी आहे. अनेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे दिवसाचे नऊ-दहा तास कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असतात. त्यातच उन्हाळ्यात पंखे आणि एसी यांचाही वापर दिवसभर होत असल्याने वीज बिल वाढले आहे.
आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे.
दुसरीकडे, विजेचा वापर झाला नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. त्यामुळे वीज बिल पाहूनच अनेकांना मोठा ‘शॉक’ बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.