मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र; अशोक चव्हाण यांचा आरोप

| Updated on: Nov 02, 2020 | 7:06 PM

मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार कमी पडतंय असं म्हणण्यात काहीही तथ्य नसल्याचं सांगत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा काही राजकीय पक्षांचं षडयंत्र असल्याचा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र; अशोक चव्हाण यांचा आरोप
Follow us on

मुंबई: मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार कमी पडतंय असं म्हणण्यात काहीही तथ्य नसल्याचं सांगत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा काही राजकीय पक्षांचं षडयंत्र असल्याचा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. मात्र, हे राजकीय पक्ष कोणते? यावर त्यांनी काहीही भाष्य केलं नाही. (ashok chavan slams opposition over maratha and obc reservation)

अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. मराठा समाजाला ओबीसींचं आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही काही लोक गैरसमज पसरवत आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावण्याचं काही राजकीय पक्षांचं हे षडयंत्र आहे. या आंदोलनांमध्ये कोणत्या पक्षाचे लोक आहेत हे तुम्ही पाहा. त्यामुळे हे कोण लोक आहेत हे तुम्हाला कळेल. राजकीय हेतू ठेवून कोणी हा प्रकार करत आहे का हे पाहिलं पाहिजे. जे लोक प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत. त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही अशोक चव्हाण यांनी केला.

तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तो तुमचा हक्कच आहे. पण तुम्ही कुणाविरोधात आंदोलन करत आहात? कशासाठी करत आहात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आंदोलन करण्याऐवजी तुम्ही न्यायालयात या, असं ते म्हणाले. मागच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. या सरकारचीही तीच भूमिका आहे. कुणावरही अन्याय व्हावा, असं आम्हाला वाटत नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात ढवळाढवळ करण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार कमी पडतंय असं म्हणणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. सरकार कमी पडतंय म्हणजे नेमकं काय होत आहे? हे प्रकरण धसास लावण्यासाठी मुकूल रोहतगी आणि कपिल सिब्बल सारखे नामवंत वकील काम पाहत आहे. तुमच्याकडे यांच्यापेक्षा तज्ज्ञ वकील असतील तर त्यांनाही येऊ द्या. त्यांनाही बाजू मांडू द्या. आम्ही स्वागतच करू, असं सांगतानाच तुम्ही आंदोलन कशाला करता चांगले मुद्दे आणि वेगळे मुद्दे तुमच्याकडे असेल तर आम्हाला सांगा. आम्ही त्यानुसार न्यायालयात बाजू मांडू, असंही ते म्हणाले. (ashok chavan slams opposition over maratha and obc reservation)

 

संबंधित बातम्या:

‘अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन टाका; मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर करावा’

साताऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेकडे उदयनराजेंनी फिरवली पाठ; अनुपस्थितीची रंगली चर्चा

मराठा समाजाचा मशाल मोर्चा, 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार

(ashok chavan slams opposition over maratha and obc reservation)