औरंगाबादः एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून यामुळे महामंडळाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. औरंगाबाद विभागातील कन्नड, वैजापूर, सिल्लोड येथील प्रत्येकी 5 अशा 15 कर्मचाऱ्यांचे गुरुवारी निलंबन करण्यात आले. औरंगाबादेत निलंबन झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आता 30 वर पोहोचली आहे. मात्र निलंबनाचे पत्र म्हणजे एसटी शासनात विलीन करण्याच्या लढ्यातील सुवर्णपदक असल्याची भावना निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे अजिंठा लेणीत (Ajintha Caves) येणाऱ्या पर्यटकांना लेणीपर्यंत घेऊन जाण्यासाठी सिल्लोड (Sillod) येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी दहा खासगी वाहनांतून तीस रुपये सीटप्रमाणे पर्यटकांना अजिंठा लेणी सफरीची सुविधा प्राप्त झाली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंगळवारपासून अजिंठा लेणीतील प्रदूषणमुक्त बससेवा ठप्प झालेली आहे. तीन दिवसांपासून अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना फर्दापूर टी पॉइंटे ते अजिंठा लेणी हे चार किमी अंतर पायी किंवा बैलगाडीतून प्रवास करून गाठावे लागत होते. त्यातच बैलगाडी चालक एका फेरीसाठी दोन हजार रुपये भाडे पर्यटकांकडून वसूल करत असल्याने पर्यटकांना आर्थिक फटका बसत होता. यामुळे अजिंठ्यातील व्यापाऱ्यांनी लेणीत खासगी बसना परवानगी देण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक रामदास क्षीरसागर यांनी अजिंठा लेणीत खासही वाहनांना वाहतुकीची परवानगी मिळाल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. गुरुवारी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे. औरंगाबाद विभागाला मागील वर्षी दिवाळीत 2 कोटी 29 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा 1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान 3 कोटी 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा एसटी प्रवाशांची संख्या वाढली होती. तसेच भाडेवाढही करण्यात आली होती. त्यामुळे औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्ना 45 लाखांवरून 65 लाखांपर्यंत गेले होते. परत जाणाऱ्या प्रवाशांमुळे एसटीच्या तिजोरीत आणखी भर पडणार होती. मात्र संपामुळे चार दिवसातच विभागाचे किमान 2 कोटींचे उत्पन्न बुडाले.
इतर बातम्या-