मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात मनसेला जोरदार धक्का बसला आहे. कारण रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत, राष्ट्रवादीत एन्ट्री केली आहे. अशाचवेळी मनसेचे माजी आमदार आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. यावर मौन सोडत बाळा नांदगावकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
चर्चांवर बाळा नांदगावकर यांचे स्पष्टीकरण
शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चा या केवळ अफवा आहेत असे स्पष्टीकरण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आहे. मी आज तुम्हाला प्रतिक्रिया देतोय ते मनसेच्या शिवडी गडाच्या कार्यालया बाहेर उभा राहून, या सर्व चर्चा सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मी कुठेही जाणार नाही. शनिवारी माझ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी राजसाहेब ठाकरे येत आहेत. असेही ते म्हणाले आहेत.
कामासाठी अनेक मंत्र्यांना भेटतो
कामसाठी मी अनेक मंत्र्यांना भेटतो. तसेच अभिजीत पानसेही भेटले असतील, राज ठाकरे अनेक मंत्र्यांना कामानिमित्त फोन करतात त्यात विशेष काही नाही, त्यामुळे या चर्चांना जास्त महत्व देऊ नये असेही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. ज्यांना जायचे त्यांना जाऊद्या आताची पिढी हुशार आहे, त्यांना योग्य निर्णय घेता येतो, असा टोलाही मनसे सोडणाऱ्यांना बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे. मात्र रुपाली पाटील यांच्या जाण्याने पुण्यात महापालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादीने मोठा झटका दिलाय एवढं मात्र नक्की. आता याचा पालिका निवडणुकीवर किती परिणाम होतो, हे निवडणुकीनतंरच कळेल.