पर्थ: बांग्लादेशच्या टीमने रविवारी झिम्बाब्वेला हरवलं. बांग्लादेशच्या या विजयामुळे पाकिस्तानचा फायदा झाला आहे. बांग्लादेशच्या विजयामुळे पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या आशा कायम आहेत. बांग्लादेशने 3 धावांनी हा रोमांचक सामना जिंकला. या मॅचआधी पॉॉइंटस टेबल पाहिलं तर, पाकिस्तानचे 0, झिम्बाब्वेचे 3 आणि बांग्लादेशचे 2 पॉइंट होते.
दुसऱ्या टीमच्या कामगिरीकडे लक्ष
पाकिस्तानला आधी भारताने नंतर झिम्बाब्वेने पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तान टीमचा सेमीफायनलमध्ये प्रवेशाचा मार्ग कठीण झाला आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला आपले सर्व सामने जिंकावे लागतील. त्याशिवाय दुसऱ्या टीमच्या निकालावरही अवलंबून रहाव लागेल.
अशी आहे स्थिती
ग्रुप 2 मध्ये भारतीय टीम दोन विजयांसह टॉपवर आहे. दोन विजयासह टीम इंडियाचे 4 पॉइंटस आहेत. बांग्लादेशची टीम झिम्बाब्वेर विजय मिळवून दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोघांचे प्रत्येकी 3-3 पॉइंटस आहेत. पाकिस्तानने नेदरलँडसवर विजय मिळवला असून त्यांचे दोन पॉइंटस झाले आहेत.
पाकिस्तानची अपेक्षा काय?
भारत, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे किंवा दक्षिण आफ्रिकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे सहा पॉइंटस होतील. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या दोन्ही टीम्सना भारताने हरवावं अशी पाकिस्तानची अपेक्षा असेल. पाकिस्तानचा नेट रनरेटही फार चांगला नाहीय. पाकिस्तान उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करेल.
पाकिस्तानचे 2 सामने बाकी
पाकिस्तानचे दोन सामने बाकी आहेत. तीन नोव्हेंबरला सिडनीमध्ये ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळतील. त्यानंतर 6 नोव्हेंबरला एडलेड ओव्हलमध्ये बांग्लादेश विरुद्ध ते खेळणार आहेत. पाकिस्तानसाठी या वर्ल्ड कपची निराशाजनक सुरुवात झाली आहे. आधी भारत त्यानंतर झिम्बाब्वेने हरवलं.