पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Bihar Assembly Election Result 2020) समोर आल्यानंतर राष्ट्रीय जनचा दल (राजद) आणि महागठबंधनच्या नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. त्यामुळे या नेत्यांकडून आतापासूनच विजयाची तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे राजदचे उमेदवार अनंत सिंह हे सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी विजयाआधी जल्लोषाच्या तयारीला सुरुवात केली आहे (Bihar Assembly Election Result 2020).
अनंत सिंह यांनी यावर्षी राजदच्या तिकिटावर मोकामा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवली आहे. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे या मतदारसंघात ते चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघात त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या मतदारसंघात ते छोटे सरकार म्हणून ख्यातनाम आहेत.
अनंत सिंह यांनी 2005 आणि 2010 साली जदयूच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्ती असल्याचेदेखील बोलले जायचे. पण 2015 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढली होती. तरीदेखील ते निवडून आले होते. त्यानंतर यावेळी त्यांनी राजदच्या तिकीटावर निवडणूक लढवली.
या निवडणुकीतही जिंकणारच असा विश्वास अनंत सिंह आणि त्यांच्या समर्थकांना आहे. बिहार निवडणुकीचा निकाल उद्या (मंगळवार 12 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनंत सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाटणा येथील घराबाहेर मोठा मंडप बांधला आहे. या मंडपात जवळपास 10 हजार नागरिकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, राजद पक्षाकडून सर्व कार्यकर्त्यांना संयम आणि शिस्त पाळण्याची सूचना देण्यात आली आहे. निवडणुकीचा निकाल काहीही आला तरी संयमाने त्याचा स्वीकार करायचा, असं पक्षाकडून कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलं आहे.
अनंत सिंह जेलमध्ये का?
बेकायदेशीरपणे एक-47 रायफल बाळगल्याप्रकरणी अनंत सिंह जेलमध्ये आहेत. गेल्यावर्षी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्या व्हिडीओत अनंत सिंह यांचा एक नातेवाईक दोन एक-47 रायफलसह दिसला होता. त्यानंतर पोलिसांनी अनंत सिंह यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यात त्यांच्या घरात एके-47 रायफल मिळाली. याप्रकरणी अनंत सिंह यांनी आत्मसमर्पण केले होते. सध्या ते पाटण्यातील बौर जेलमध्ये आहेत. दरम्यान, अनंत सिंह गेल्या महिन्यात पोलीस व्हॅनमधून मोठ्या ऐटीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपविभाग मुख्यालयात दाखल झाले होते.