औरंगाबादः पैठण तालुक्यातील वाहेगाव (Wahegaon, Paithan) येथे काही दिवसांपूर्वी डस्टर कार (burned car) जळून खाक झाल्याचे समोर आले होते. ही गाडी नेमकी कुणी जाळली, याविषयी अनेक चर्चा होऊ लागल्या. मात्र आता या चर्चांवर पडदा पडला आहे. ही कार खुद्द मालकानेच जाळल्याचे समोर आले आहे. गाडीमालकाने कर्ज बुडवण्याच्या हेतूने हा खटाटोप केल्याचे पैठण एमआयडीसी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जळालेली ही डस्टर गाडी बेवारस स्थितीत आढळून आली होती. गाडीच्या नंबर प्लेटवरून ही गाडी गंगापूर तालुक्यातील मानेगाव येथील असल्याचे समोर आले. गाडी मालकाने गाडी चोरीला गेल्याची फिर्यादही गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेली होती. त्यामुळे चोरट्याने ही गाडी वाहेगाव भागात आणून जाळल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते.
प्रथम दर्शनी चोरट्यानेही ही गाडी येथे आणून जाळल्याचे दिसत असले तरीही या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांना काहीतरी संशय आला. घडला प्रकार, दिसतोय तेवढा साधा नसल्याचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी सखोल तपास करून घटनाक्रमाची साखली जोडली. तेव्हा चोराने नव्हे तर गाडीमालक महेश गावंडे यानेच गाडीचे अग्निकांड घडवून आणल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांनी गाडी मालकाची रितसर चौकशी केली असता मालकाने आपला गुन्हा कबूल केला. या गाडीच्या दुरुस्तीचे काम निघाले होते. तसेच गाडीवरील कर्ज बुडवण्यासाठी आपण ही गाडी जाळल्याची कबुली गावंडे याने पोलिसांना दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गावंडेला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, फौजदार राहुल भदरगे, दिलीप चौरे, बीट जमादार कातडे, खंडागळे यांनी ही कामगिरी केली.
इतर बातम्या-
अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई