मुंबई : “राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही (Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray). त्याची घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. मात्र ते शक्यच नाही. घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाहीत”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली (Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray).
उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोट्यातून आमदार बनण्याला आक्षेप आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझा मुद्दा वेगळा आहे. दिवा लावायला विरोध, टाळ्या वाजवायला विरोध, जे अत्यावश्यक सेवा करतात त्यांचं कौतुक करायला विरोध. उद्योगपती वाधवानला मात्र महाबळेश्वरला पाठवायला विरोध नाही. त्याबाबत बोललं की ते राजकारण झालं. अजूनही दोन महिने आहेत. दोन महिन्यानंतरच अशी स्थिती येईल की आमदार नाही झाले तर त्यांना (उद्धव ठाकरेंना) राजीनामा द्यावा लागेल. मग आता मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्याची काय गरज होती? आमचा उद्धवजींना राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याला विरोध नाही, त्याची जी घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. पण ते शक्यच नाहीय, घटनात्मकदृष्ट्या ते होऊच शकत नाहीत”.
“मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा विषय वेगळा आहे. आमचं म्हणणं हे आही की, ही काय वेळ आहे का? आधी कोरोनाचा सामना करा, असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले. आम्ही टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी जे जीवावर उदार होऊन काम करत आहेत, त्यात गैर काय? त्यात खर्च काय झाला? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. त्याचबरोबर केंद्र सरकारने 8 कोटी महिलांना गॅस दिला, 20 कोटी महिलांच्या अकाऊंटवर प्रत्येकी 500 रुपये दिले”, अशी माहिती त्यांनी दिली.
“संजय राऊतांची मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. सत्तास्थापनेच्या काळात रोज उठून राऊत मीडियासमोर येऊन बसायचे. पण जनतेचा मोदींवर विश्वास आहे”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
हेही वाचा : सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील
केंद्राने महाराष्ट्रालाच जास्त पैसे दिले आहेत. प्रत्येकवेळी केंद्राने काय दिलं असं म्हणून चालणार नाही, तुमचा रोल काय? केंद्राने 1600 कोटी रुपये पाठवले. त्याचा हिशेब सांगा. मायनिंगचे 30 टक्के खर्च का करत नाहीत? 9 हजार कोटी रुपये कामगार मंडळात आहे ते कुठे आहेत? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
“प्रत्येक गोष्ट केंद्राकडून येत आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही एक स्कीम दाखवा महाराष्ट्राने केलेली. रेशन सोडलं तर महाराष्ट्र सरकारने लागू केलेली एक योजना दाखवा, लोकांशी खोटं बोलू नका. केंद्र सरकार महाराष्ट्राला जे जे हवं आहे ते ते पुरवत आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“तब्लिगींचा दोष केंद्राला देणं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, तिथून आलेले लोक तुम्हाला महाराष्ट्रात सापडत नाहीत, मोबाईल ऑफ जरी असला तरी शोधता येतं. ते लोक बिनधास्त फिरत आहेत”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
“अन्य राज्यातील लोकांसाठी निवार केंद्र उभी केली आहेत. पण ती कुठे आहेत? लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय करणे आवश्यक आहे. पुण्यात आम्ही गेल्या 15 दिवसात, दुपारी आणि रात्री चपाती आणि भाजी देतो. प्रिस्क्रिप्शन पाठवल्यावर औषधं पाठवतो. पुण्यात 1 लाख 31 हजार घरात किराणा पोहोचवला. हेतू काय तर लोकांनी बाहेर पडू नये”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
“त्रृटी दाखवून सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही, संकट मोठं आहे. एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाणं आवश्यक आहे. मात्र त्रुटी दाखवल्या नाहीत तर सरकारवर अंकूश राहणार नाही. रेशनचा विषय लावून धरल्यानंतर ७ दिवसांनी निर्णय झाला”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
“केंद्राने उचललेली पावलं, त्याला महाराष्ट्रानेही गतीने फॉलो केलं त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, तरीही मुंबई-पुण्यातील स्थिती नियंत्रणात येणं आवश्यक आहे. राज्य सरकारने मुंबई-पुण्यात बाहेर पडणाऱ्यांची स्थिती कंट्रोलमध्ये आणावी. उर्वरित महाराष्ट्रात स्थिती कंट्रोलमध्ये आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.