चंद्रपूर : कोरोनाबाधित एकही रुग्ण जिल्ह्यात नसल्यामुळे (Curfew in Chandrapur) काही लोकांनी प्रशासनाकडे अत्यावश्यक वस्तूंची दुकान सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे दररोजच्या वापरातील काही वस्तूंची दुकानं आजपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयानंतर बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी बघायला मिळाली. त्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाला अवघ्या 12 तासातच संचारबंदी अंशत: शिथील करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला (Curfew in Chandrapur).
कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात जीवनाश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद आहेत. महाराष्ट्रातही या संचारबंदीचे काटेकोर नियम पाळले जात आहेत. मात्र, चंद्रपुरात संचारबंदी अंशत: शिथील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.
या निर्णयानुसार जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल विक्री आणि दुरुस्ती, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, कापड दुकान आणि लाँन्ड्रीच्या दुकान मालकांना आपली दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता प्रशासनाने हा निर्णय मागे घेतल्यामुळे ही दुकानं बंदच राहणार आहेत.
विशेष म्हणजे या सर्व दुकानांना सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे दिवस ठरवून देण्यात आले होते. हे सगळं प्रायोगिक तत्वावर होतं. यामुळे अनावश्यक गर्दी होत असेल आणि लोक नियम पाळत नसतील तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती.
संचारबंदी शिथील करताच आज सकाळी बाजारपेठांमध्ये लोकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. संचारबंदीचं सर्रास उल्लंघन करीत शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी घेऊन नागरिक गर्दी करताना दिसले. हे चित्र अंगलट येण्याची शक्यता दिसताच जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय मागे घेत पुन्हा संचारबंदी जैसे थे कायम ठेवली.
संबंधित बातमी : Corona | राज्यात 26 नव्या रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या जवळ