कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : मुख्यमंत्री

| Updated on: Aug 11, 2020 | 4:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (11 ऑगस्ट) दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली (CM Uddhav Thackeray on corona pandemic).

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : “राज्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, अजुनही लढाई संपलेली नाही. पण कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले (CM Uddhav Thackeray on corona pandemic).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (11 ऑगस्ट) दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रासोबतच गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांचा आढावा घेतला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, तसेच विविध राज्यांचे मुख्य सचिव उपस्थित होते (CM Uddhav Thackeray on corona pandemic).

“या दहा राज्यांमध्ये ॲक्टीव्ह केसेसचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाविरोधाच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या राज्यांकडून कोरोनाविरोधात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही दहा राज्ये जिंकली तर देश जिंकेल”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचबरोबर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. “राज्य सरकारने लॉकडाऊनदरम्यान शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ 5 रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना आणि मातांना दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली

“कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे, यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु केले जाणार आहेत”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या विषाणूंचा उद्भव कसा आणि का होतो? यावर संशोधन करण्याची गरज आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध आहेत. मात्र या सुविधांसाठी डॉक्टर, नर्से, कर्मचारी यांची गरज आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.