मुंबई : केंद्रीय पथकाने राज्यातील विविध ठिकाणांची पाहणी करुन कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (23 एप्रिल) प्रशासनाला दिले (Uddhav Thackeray on Corona central committee). तसेच राज्यात मुंबई -पुण्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढवणे याला प्राधान्य असल्याचंही नमूद केलं. यासाठी केंद्रीय पथकाच्या सूचना महत्त्वाच्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकाने राज्य सरकारकडून होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांबद्दल समाधान व्यक्त केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “पीपीई कीट्सची आवश्यकता पुढील काळात आणखी लागू शकते. त्यामुळे आता अशा कीट्स केंद्राने तातडीने उपलब्ध करणे महत्वाचे आहे. स्थानिकरित्या देखील काही कंपन्या असे कीट्स उत्पादित करत आहेत. मात्र, केंद्राने याबाबतीत त्वरित मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.” केंद्रीय पथकाने रुग्णालयांतील सुविधा, क्वारंटाईन पद्धती, चाचण्या व या अनुषंगाने दिलेल्या सूचनांवर मुंबई आणि पुणे येथील प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरु करावी असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
सध्या राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुमारे 7 दिवसांचा आहे आणि तो 10 दिवसांपेक्षा जास्त करण्याचे ठरवण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 78.9 टक्के रुग्णांमध्ये इतरही आजार होते. तसेच मरण पावलेले रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत असंही समोर आलं आहे. अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचे केंद्रीय पथक गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत आले आहे, तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय पथक पुणे आणि परिसराचा दौरा करीत आहे.
वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्याशिवाय या पथकांनी लॉकडाऊन उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, शारिरीक अंतराच्या निकषाचं पालन, आरोग्य विषयक सुविधांची सज्जता, आरोग्य व्यावसायिकांची सुरक्षा आणि मदत शिबिरांमधील मजुरांची स्थिती याचा आढावा घेतला आणि सूचनाही केल्या.
पथकाच्या सुचना
“कोरोनावर उपचार करताना इतर रुग्णांचे हाल नको”
पथकाच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत तातडीने निर्देश दिले. कोरोना नसलेल्या इतर आजारांच्या रुग्णांचे हाल होत आहेत अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे तातडीने महापालिकेने अशा सर्व कोरोना उपचार करणाऱ्या आणि कोरोना नसलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नॉन कोव्हीड दवाखाने, रुग्णालये आणि फिव्हर क्लिनिक्सची माहिती सर्वसामान्यांना द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिकेला दिले.
‘नर्सिंग होम्स बंद ठेऊ नयेत’
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “खासगी क्लिनिक्स, नर्सिंग होम्समधील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना आपल्या सुरक्षेची काळजी आहे हे मी समजू शकतो पण अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्ण, डायलेसिसचे रुग्ण, ह्रदयविकार रुग्ण , लहान मुलांचे , वयोवृद्ध लोकांचे आजार यावर उपचार कोण करणार? सर्व नर्सिंग होम्स यांनी आपले दवाखाने उघडून या रुग्णांची सेवा केली पाहिजे. सरकार त्यांना पीपीई कीट किंवा इतर सामुग्री उपलब्ध होताच निश्चितपणे पुरवेल.” प्लाझ्मा थेरपीला देखील लवकरात लवकर मान्यता मिळणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात केरळपेक्षा 6 पट जास्त चाचण्या
यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी महाराष्ट्रात केरळ व इतर राज्यांपेक्षा 6 पट जास्त चाचण्या होत असल्याची माहिती दिली. पीपीई कीट्स नेमके कुणी वापरावे याबाबतीतही केंद्राने धोरण आखून द्यावे असंही ते म्हणाले.
“कंटेनमेंट झोन्स कमी होत आहेत”
मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले, “मुंबईत 55 हजार चाचण्या झाल्या असून आज 4270 चाचण्या दर 10 लाख लोकांमागे झाल्या आहेत. सध्या मुंबईतल्या 326 ठिकाणी कंटेनमेंट झोन्स असून 447 झोन्स इमारतींच्या परिसरात आहेत. इमारतीत असलेले झोन्स झपाट्याने कमी होत आहेत ही समाधानाची बाब आहे.”
मोठ्या प्रमाणावर होमगार्ड्सची मदत देखील आम्ही घेतली असून कंटेनमेंट धोरण अधिक प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी नियोजन केले आहे. आजच्या दिवशी 1180 चाचण्या धारावीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पुणे येथील केंद्रोय पथकाने देखील ससून रुग्णालयात अधिक सुविधा मिळणे आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या :
राज्यात तब्बल 778 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 वर
मुंबईत 8 वॉर्डमध्ये 200 हून अधिक रुग्ण, कोणत्या वॉर्डत किती?
लॉकडाऊनदरम्यान कामगारांना पगार न दिल्याने कंपनीविरोधात गुन्हा, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
पुण्यात तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 1500 तर 15 मेपर्यंत 3 हजार होण्याची शक्यता : आयुक्त
Uddhav Thackeray on Corona central committee