मुंबई : “थंड पाणी, थंड पेय, थंड सरबत टाळा आणि त्याऐवजी कोमट पाणी प्या (CM Uddhav Thackeray Corona Virus). त्याने कोरोनावर उपचार होईल असं नाही. मात्र, सर्वसाधारण सर्दी आणि खोकला बरा होईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना अनेक सूचना दिल्या (CM Uddhav Thackeray Corona Virus).
“सध्याच्या वातावरणात ताप आणि खोकला येणं नैसर्गिक आहे. घाबरुन जाऊ नका. गरम होतं म्हणून एसी लाऊ नका. साधारण वातावरणात विषाणू फार काळ जगत नाही. एलर्जीपासून दूर राहा. सर्दी, खोकला आला तर नेहमीच्या रुग्णालयात जाऊ नका. सरकारी रुग्णालयात जा. कारण कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर इतर रुग्णांनाही त्रास होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मुंबईत काही ठिकाणी सील केलं गेलं आहे. हे करावं लागतं आहे. कारण रुग्णांच्या अलीकडचे आणि पलीकडचे संपर्क आपण शोधतोय. त्यांच्यापासून इतरांना कुणाला संसर्ग होऊ नये त्याची काळजी आपण घेत आहोत”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“नायडू हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यांनी घातलेले किट पाहून गणवेशधारी सैनिक बसले आहेत असं वाटत होतं. आरोग्य कर्मचारी, एसटी, बीएसटी गाडी चालक, पोलीस या सर्व कर्मचाऱ्यांची कौतुक करायचे आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“हे युद्ध आता अटीतटीच्या वळणावर आलं आहे. हाच तो काळ आहे या काळात हा विषाणू गुणाकार करतो. कोरोना विषाणू आपली पकड मजबूत करायला बघतोय. पण आपणसुद्धा धैर्याने त्याला तोंड देत आहोत. या लढाईत आपला संयम आणि आपली जिद्ध ही तटबंदी आहेत. या तटबंदीवर विषाणूंनी कितीही टकरा मारल्या तरी आपण लेचेपेचे नाही आहोत. कारण संयमाची आणि जिद्दीची तटबंदी मजबूत आहे. टकरा मारुन तो विषाणू नष्ट होईल”, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातमी : एकच मंत्र, गर्दी करु नका, आपण या युद्धात जिंकणारच : मुख्यमंत्री