मुंबई : “विलगीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार करेल. विलगीकरणासाठी वेगवेगळे हॉटेल्स घेत आहोत. जे हॉटेल्समध्ये राहू शकतात त्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करुन देऊ”, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात कोरोना फोफावत चालला आहे. आतापर्यंत राज्यात 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार महत्त्वाची पावलं उचलत आहे (CM Uddhav Thackeray).
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील सर्व ग्रामीण शाळांना देखील 30 मार्चपर्यंत सुट्टी दिल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता पाळण्याची विनंती केली.
कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होईल का?
यावेळी कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होईल का? असा प्रश्न विचारला असता “हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. संपूर्ण जग मंदीच्या सावटमध्ये असताना हे संकंट आलेलं आहे. यासाठी राज्यातील सचिवांची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मंदीच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना करता येतील त्यासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत. जसं कोरोना टाळावा यासाठी आपण उपाययोजना करत आहोत तसंच कोरोनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसू नये त्यासाठी उपाययोजना केली जात आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘प्रार्थनास्थळांवर भाविकांनी गर्दी कमी करा’
“धार्मिक स्थळे येथे गर्दी होऊ देऊ नका, अशी मी विनंती करतो. आता धोक्याची आणि भीतीची वेळ जरी आलेली नसली तरी काळजी घेणं जरुरीचं आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका. रेल्वे आणि बसचा अनावश्यक प्रवास टाळा. स्वत:हून आपण बंधनं पाळू तेवढं लवकरात लवकर या संकटात आपण बाहेर येऊ”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“शहरातील लोकांना मी विनंती करतो की, रेल्वे, बससेवा आणि हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. मॉल्स बंद करण्याचे निर्णय आम्ही घेतलेला आहे. एकूण आम्ही जनतेसाठी हे सर्व करत आहोत. जनताही स्वत:हून पुढे येऊन स्वयंशिस्त पाळेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला कायदा करणं योग्य नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“संपूर्ण जग कोरोनाने ग्रासले आहे. एखाद-दुसरा देश राहिला असेल जिथे कोरोनाचा प्रादूर्भाव राहिला असेल. हे एक जागतिक आरोग्यावरील संकट आहे. यात एक गोष्ट लक्षात आली आहे की, ज्या देशात मोठ्या प्रमाणात हाहा:कार झाल्याचे बघत आहोत. त्या देशांमध्ये पहिल्या-दुसरा आठवड्यामध्ये फारसं काही जाणवलं नव्हतं. तो साधारणत: तिसऱ्या-चौथ्या आठवड्यामध्ये त्याच्यात खूप मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने पुढचे 15 ते 20 दिवस प्रचंड महत्त्वाचे आणि काळजीचे आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“तिसरा आणि चौथा आठवड्यासारखे दिवस आपल्या राज्यासाठी सुरु होत आहे. आता आपल्याला काळजी घेण्याची जास्त गरज आहे. सुरुवातीला फक्त पिंपरी-चिंचवड या दोन शहरांपुरता बंदी मर्यादित होती. काल आम्ही राज्यभरासाठी निर्णय घेतला होता. आज ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“रेल्वे, एसटी बसच्या अधिकाऱ्यांशी आज बैठक घेतली. स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर किटनाशकांची फवारणी, सरकारच्या सूचना पाळण्यात एकसुत्रीपणा पाहिजे. एसटी, रेल्वे सगळीकडे याबाबत जाहीरात दिली जाईल. ग्रामीण भागातील कार्यक्रम, लग्न, राजकीय कार्यक्रम रद्द करण्याची विनंती करतो. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुकाही पुढे ढकलण्याच्या विनंती केली आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा : राज्यात ‘स्टेज 2’चा कोरोना, होम कोरेनटाईन व्यक्तीच्या हातावर निळ्या रंगाचा शिक्का : राजेश टोपे