मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

| Updated on: Apr 14, 2020 | 10:18 PM

कोरोनाविरोधाच्या या लढाईत आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीदेखील साथ असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला. कोरोनाविरोधाच्या या लढाईत आपल्याला राज ठाकरे यांची साथ असल्याचं मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) म्हणाले. याशिवाय देशातील वेगवेगळ्या नेतेमंडळींच्या एकजुटीचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.

“कोरोनाच्या संकंटात सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते राजकारण आणि त्यांचे पक्ष बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. हे सर्व नेतेमंडळी हातात हात घालून कोरोनाविरोधात लढत आहेत. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझं फोनवर बोलणं सुरुच असतं. अमित शहा यांच्याशी आजही माझं बोलणं झालं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतही माझं बोलणं झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबत आहेत. राज ठाकरे यांचीदेखील मला साथ आहे. सर्वच पक्ष एकत्र आले आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी याअगोदरही जनतेला संबोधित करताना राज ठाकरे यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरे यांच्याशी आपलं फोनवर बोलणं झालं असून त्यांनी काही सूचना दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनीदेखील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं होतं.

उद्धव ठाकरे यांच्या निवदेनातील महत्त्वाचे मुद्दे:

  • कोरोनानंतर आणखी एक मोठं संकट येणार आहे हे संकट आर्थिक असेल.
  • आगामी काळात येणाऱ्या आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात समिती करण्यात आली आहे.
  • शेतकरी आपला अन्नदाता, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
  • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहिल.
  • 20 एप्रिलनंतर कोणते उद्योग सुरु करता येतील यावर अजित पवार आणि त्यांची समिती निर्णय घेईल.
  • मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये अधिक काळजी घेतली जात आहे.
  • तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मजुरांना शब्द
  • गोरगरीब मजुरांच्या भावनांशी खेळू नका, त्याचं राजकारण करु नका
  • कुणीतरी गैरसमजाचं पिल्लू सोडल्यामुळे वांद्र्यातील गर्दी
  • तुम्ही परराज्यातून आले आहात, पण तुम्हाला लॉक करुन ठेवण्यात आम्हाला आनंद नाही, मात्र काळजी करु नका, तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात
  • कोरोनानंतर आर्थिक संकटाच्या सामन्यासाठी समिती स्थापन
  • आरोग्य यंत्रणेसाठी टास्क फोर्स सज्ज
  • विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती
  • प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि ईसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल

संबंधित बातम्या :

तुम्हाला घरात बंद करण्यात आम्हाला आनंद नाही, थोडा संयम ठेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Extended Lockdown : वांद्र्यातील गर्दी ते आगीचे बंब, टास्क फोर्स ते तज्ज्ञ समिती, मुख्यमंत्र्यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे