मुंबई : “कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, दिग्गज, कलाकार, खेळाडू आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत (CM Uddhav Thackeray). अभिनेतचा शाहरुख खानकडून विलगीकरण कक्षासाठी जागेची ऑफर आली आहे. ताज आणि ट्रायडेंटसारख्या मोठ्या हॉटेल मदतीसाठी पुढे आल्या आहेत. सोलापूरच्या सात वर्षाच्या आराध्याने आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत केली. सात वर्षाच्या मुलीमध्ये ही समज आली असेल तर आज आपण हे युद्ध जिंकलं असं समजा”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले (CM Uddhav Thackeray).
उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधताना सोलापूरच्या आराध्या नावाच्या चिमुकलीचे कौतुक केलं. “आज संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात सर्वजण संयम दाखवत आहेत. त्यात या चिमुकलीचं वेगळेपण म्हणजे आज तिचा वाढदिवस आहे. आराध्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या. तमाम महाराष्ट्राच्यावतीने तुला आशीर्वाद देतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“प्रत्येक जण काहीना काही मदत करत आहे. आराध्याचं हे वय हट्ट करण्याचं, लाड पुरवून घ्यायचं आहे. पण आराध्या आज तू वेगळा आदर्श जगामोर निर्माण केला आहे. आराध्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मदत दिली आहे. आराध्याने आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. हीच आपल्या महराष्ट्राची वृत्ती आणि हीच महाराष्ट्राची ओळख आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, दिग्गज, कलाकार,खेळाडू आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. विलगीकरण कक्षासाठी आपल्या जागा मोकळ्या करुन देत आहेत. शाहरुख खान यांनी त्यांची जागा ऑफर केली आहे. अनेक हॉटेल्सने खास करुन ताज आणि ट्रायडेन्ट यांनी डॉक्टर्सच्या राहण्याची सोय केली आहे. यापूर्वीच त्यांनी आपली हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी दिली आहेत. काही जणांनी आपले हॉस्पिटल्स दिले आहेत. काही संस्था स्वत:हून जेवणाचं वाटप करत आहेत. काहीजण पैसे देत आहेत. प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत करत आहेत आणि स्वत:हून पुढे येत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“या एका युद्धामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे की, सर्वजण जातपात, पक्ष सर्व एका बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. पंतप्रधान मोदी देखील चर्चा करत असतात, फोन करत असतात. आज सोनिया गांधी यांनीदेखील फोन केला. शरद पवारही सोबत आहेत. सर्व धर्माचे धर्मगुरुसुद्धा सोबत आहेत. काही मुल्ला-मौलवी माझ्या संपर्कात आहेत. त्यांनाही मी आवाहन केल्यानंतर त्यांनीही आवाहन केलं आहे. अनेक संस्था, व्यक्ती, दिग्गज, कलाकार,खेळाडू आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
संबंधित बातमी : आतापर्यंत हात जोडलेत, फेक व्हिडीओने महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा… : मुख्यमंत्री