वर्धा : दिल्लीच्या निजामुद्दीन येथील एका कोरोना (Corona Suspected patient in Wardha) पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वर्ध्यातील आठ जणांना प्रशासनाने ट्रॅक केलं आहे. या आठ जणांपैकी एकच व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे पोहचला आहे. जिल्हा प्रशासनाने त्या व्यक्तीला आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना क्वारंटाईन केलं आहे. तर इतर सात जण दिल्ली, आग्रा, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यात पोहचले आहेत (Corona Suspected patient in Wardhaa).
वर्ध्यात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, दिल्लीहून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्हा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने वर्ध्यातील दिल्लीच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना ट्रॅक केलं आहे. वर्ध्यातील काही नागरिक निजामुद्दीन येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून पाळत ठेवली जात आहे.
सध्या जिल्ह्यात एकही कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली. यासोबतच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गर्दी टाळत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
जिल्ह्यात अद्याप एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळेला नाही. प्रशासनाने जिल्ह्यात परदेशातून आलेले 114 लोकांवर पाळत ठेवली होती. यापैकी 103 लोकांना गृह विलगीकरणातून बाहेर काढण्यात आले आहे. तर 11 लोकांवर त्यांच्या घरात पाळत ठेवली जात आहे. एवढंच नव्हे तर मुंबई पुण्याहून आलेल्या 8613 लोकांवर त्यांच्या घरात पाळत ठेवली जात आहे. आरोग्य विभागाने 40 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी 39 लोकांची रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर एक रिपोर्ट प्रलंबित आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात ‘तब्लिग जमात’तर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’चं प्रसारकेंद्र ठरला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून जमाती सहभागी झाले होते. ‘तब्लिग जमात’मध्ये उपस्थित राहिलेल्या जमातीपैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षण दिसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. हे जमाती आपापल्या राज्यात परतल्यामुळे ‘कोरोना’ मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती आहे.
‘तब्लिग जमात’मध्ये महाराष्ट्रातून कुठून किती जमाती?
पुणे, पिंपरी चिंचवड – 136
नागपूर – 54
औरंगाबाद– 47
अहमदनगर – 34 (29 परदेशी नागरिक)
कोल्हापूर – 21
नवी मुंबई – 17
सोलापूर – 17
नाशिक – 15
मुंब्रा (ठाणे)- 14
नांदेड – 13
यवतमाळ – 12
सातारा – 7
चंद्रपूर – 7
उस्मानाबाद – 6
सांगली – 3
वर्धा – 1
एकूण – 404