मुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. त्यामुळे ज्याप्रकारे शिवसेना-भाजपकडून युतीसाठी हालचाली सुरु झाल्यात, तशाच विरोधकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही आघाडीसाठी बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत.
सर्व विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी मित्र पक्षांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला आघाडीत घेण्यासाठी विरोधक तयार असताना, असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाला सोबत घेण्यास आघाडीचे नेते तयार नसल्याचे दिसून येते आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवसी यांचा एमआयएम या पक्षांनी एकत्र येत, वंचित बहुजन विकास आघाडीची स्थापना केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने भारिप बहुजन महासंघासोबत एमआयएमलाही आघाडीत घेतले, तरच आम्हीही आघाडीत जाऊ, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. मात्र, आघाडीचे नेते एमआयएमला सोबत घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत नाही.
आगामी काळात भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील की विरोधकांमध्येच फूट दिसेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.