नागपूर : 99 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला यंदा वादाचं गालबोट लागलं आहे. मानसन्मानावरुन नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे. नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या आदल्या दिवशीच वादाला सुरुवात झाली आहे. उद्यापासून नागपुरात 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी हे या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
नाट्य संमेलनाच्या आयोजन समित्या ठरवताना सन्मानजनक वागणूक दिली नाही, समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले नाही. त्यामुळे आम्ही संमेलनादरम्यान घटनात्मक मार्गाने विरोध करु, असा इशारा नाट्य परिषदेच्या नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी दिला आहे.
महिन्याभरापूर्वी यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वाद अजूनही ताजाच आहे. त्यानंतर आता नाट्य संमेलनाचा वाद सुरु झाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटनासाठी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं आमंत्रण अचानक रद्द करण्यात आले. त्यानंतर सर्वच स्तरातून साहित्य महामंडळावर टीका झाली होती. अनेकांनी संमेलनावरही बहिष्कार टाकला होता, टीका केली होती. त्यामुळे साहित्य संमेलनाने वादाची ‘परंपरा’ कायम राखली. त्यानंतर आता नाट्य संमेलनही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत.