मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच आता कोरोनाची नवी लक्षणेदेखील समोर येऊ लागले आहेत (Corona new symptoms). आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, कोरडा खोकला, थकवा येणं ही कोरोनाची लक्षणे मानली जात होती. मात्र, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या वैद्यकीय संस्थेने कोरोनाची आणखी तीन नवी लक्षणे सांगितली आहेत (Corona new symptoms) .
1. सतत नाक वाहणं
सीडीसीच्या ताज्या माहितीनुसार, सतत नाक वाहणं हेदेखील कोरोनाचं नवं लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीचं सतत नाक वाहत असेल तर त्याची कोरोना टेस्ट करायला हवी. अशा व्यक्तीला कदाचित ताप नसेलही. मात्र, तरीही त्याची कोरोना टेस्ट केली जावी, असं सीडीसीने म्हटलं आहे.
2. मळमळ किंवा अस्वस्थ वाटणं
एखाद्या व्यक्तीला वारंवार मळमळ किंवा अस्वस्थ वाटत असेल तर त्याचीदेखील कोरोना टेस्ट करावी. काही वेळेला मळमळ किंवा अस्वस्थ वाटण्याचे कारण वेगळं असू शकतं. मात्र, वारंवार तसा त्रास होत असेल तर कोरोना टेस्ट कारावी, असंदेखील सीडीसीने म्हटलं आहे.
3. अतिसार किंवा जुलाब
जगभरात आढळलेल्या बहुतेक रुग्णांना अतिसार किंवा जुलाबचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशाप्रकारची लक्षणे आढळल्यास रुग्णाची तातडीने कोरोना टेस्ट करुन आयसोलेट करावं, अशी सूचना सीडीसीने दिली आहे.
सीडीसीने सांगितलेल्या या तीन नव्या लक्षणांमुळे कोरोनाची 11 लक्षणं नमूद करण्यात आली आहेत. सीडीसीने याआधी कोरोनाची आठ लक्षणे नमूद केले होते. त्यात आता आणखी तीन नवी लक्षणं नमूद करण्यात आले आहेत.
कोरोनाची 11 लक्षणे कोणती?
1. ताप किंवा थंडी वाजणे
2. खोकला
3. श्वास घेण्यास त्रास होणे
4. थकवा येणं
5. स्नायंमध्ये दुखणे
6. डोकेदुखी
7. चव न कळणे किंवा वास न येणे
8. घशात त्रास होणे किंवा घसा खवखवणे
9. सतत नाक वाहणं
10. मळमळ किंवा अस्वस्थ वाटणं
11. अतिसार किंवा जुलाब
हेही वाचा : असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा थेट इशारा