उस्मानाबाद : जगरात थैमान घालणारा कोरोना महाराष्ट्रातही फोफावत चालला आहे (Corona in Osmanabad). उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी उस्मानाबादमध्ये 2 रुग्ण सापडल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली. उस्मानाबादमध्ये आढळलेला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा लोहारा तालुक्यातील धानोरी गावाचा रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी मुंबई येथून आला होता (Corona in Osmanabad).
उस्मानाबादेत सापडलेला दुसरा कोरोना रुग्ण हा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचा. त्याची तपासणी केल्यानंतर रुग्णाला कोरोना झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आलं, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. हा रुग्ण मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये कामाला असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यानंतर तो उस्मानाबादला आला.
हा कोरोनाबाधित रुग्ण भाजीपाला गाडीतून मुंबईहून येनेगुरपर्यंत आला आणि त्यांनतर दुधाच्या वाहनात बसून गावी पोहोचला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यांना सर्वांना गावातील शाळेत ठेवण्यात आलं असून त्यांची स्वॅब तपासणी होणार आहे.
रुग्णाला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. या रुग्णात कोरोनाचे कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, तरीही रुग्णाची स्वॅब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्याअगोदर घरी सोडलंच कसं? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. काही जणांच्या हलगर्जीपणामुळे धोका वाढला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण उमरगा तालुक्यातील बलसुर येथे सापडला आहे. हा रुग्ण दिल्ली आणि पानिपत येथे फिरायला गेला होता. तो 2 दिवसांपूर्वी उमरगा येथे आला. त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले. या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.
या रुग्णावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. या रुग्णाच्या पत्नीचीदेखील तपासणी करण्यात आली. त्याच्या पत्नीचा अहवाल निगेटीव्ह आला. मात्र, पानिपत आणि हॉटेल ताज मार्गे कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्याची बाब उघड झाली आहे.