मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी (Corona Patients are recovering) हळूहळू कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. महाराष्ट्रासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. नागपुरात आतापर्यंत 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे काल (29 एप्रिल) नुकतंच पिता-पुत्रीने कोरोनावर मात केली. यवतमाळमधील कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढला. मात्र, काल एकाने तर आज 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली. अमरावतीतही आतापर्यंत 4 रुग्णांची प्रकृती बरी झाली आहे (Corona Patients are recovering).
नागपुरात 92 रुग्णांवर उपचार सुरु
नागपुरात सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्ण आढळले नव्हते. मात्र, सतरंजीपुरा भागात एक रुग्ण आढळला आणि कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढला. तरीही न डगमगता प्रशासनाने लढा दिला. नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा 136 वर पोहोचला आहे. यापैकी 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले परिसर सील करण्यात येत आहेत.
अमरावतीत 24 रुग्णांवर उपचार सुरु
अमरावतीत आज 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमरावती येथील कोरोनाबाधितांचा आकडा हा 35 वर पोहोचला आहे. अमरावतीत सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये 3 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. कोरोनामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 7 जणांचा बळी गेला आहे.
अमरावतीत सुरुवातीला कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला दोन ते तीनने वाढत होता. मात्र, आज अचानक 7 रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, अमरावतीत आतापर्यंत 4 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या अमरावतीत 24 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
यवतमाळमध्ये 78 रुग्णांवर उपचार सुरु
यवतमाळमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 वर पोहोचली आहे. यवतमाळमध्ये आज 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या यवतमाळमध्ये 78 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना दिलासा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांसाठी नियमावली जारी
APMC मार्केटमधील आणखी दोघांना कोरोना, आकडा 18 वर, शनिवारपासून भाजीपाला मार्केट बंद