नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना अखेर दिलासा मिळणार आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीच अवघ्या काही आठवड्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु करणार असल्याचे संकेत दिले आहेत. नरेंद्र मोदींनी शुक्रवारी (4 डिसेंबर 2020) सर्वपक्षीय बैठकीत याबाबत घोषणा केली. (Corona Vaccination Program soon to be finalized know A to Z information about price and date)
ऑनलाईन कळणार कोरोना लसीचा साठा!
कोरोनाच्या लसीकरणासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. लसीचा साठा आणि त्याची मागणी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचलित केली जाणार आहे. या लसीकरण अभियानाबद्दल देशात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी मिळून अफवेपासून दूर राहावं, आणि जनतेलाही जागरुक करावं अशी मागणी त्यांनी केली.
लसी भरपूर, पण आधी कुठली लस येणार?
ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका यांनी मिळून कोविशिल्ड ही लस बनवली. तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरल्या आहेत. मात्र, अॅस्ट्राजेनिकाने पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्याचं ठरवल्याने या लसीला काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. या लसीचं उत्पादन पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट करत आहे.
दुसरीकडे, फायझर या अमेरिकन कंपनीची लसही 94 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली आहे. ही लस नागरिकांना देण्यासाठी ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये लवकरच ही लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. याच धर्तीवर भारतातही लसीकरणाला परवानगी देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
कधी येणार कोरोनाची लस?
सध्याची परिस्थिती पाहता सीरम बनवत असलेली लस देशाला परवडणारी आहे. शिवाय ही लस पुढच्या काही आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर लस लवकर येणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळेच ही लस कदाचित पुढच्या दीड ते दोन महिन्यात येऊ शकते.
लसीसाठी खिशाला किती कात्री बसणार?
01. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनिकाची कोविशिल्ड लस –
भारत ज्या लसीकडे मोठ्या आशेने पाहतोय, ती सीरमची लस अवघ्या 200 ते 250 रुपयांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. तर खासगी संस्थांना ही लस 1 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र केंद्र सरकार यासाठी महालसीकरण मोहीम राबवत आहे. त्यामुळे ही लस फुकटात सर्वांना टोचली जाण्याची शक्यता आहे.
02. फायझरची कोरोना लस-
फायझर ही अमेरिकेची कंपनीही कोरोनाच्या लढाईत पुढे आली आहे. इंग्लंड सरकारने या कंपनीबरोबर लसीसाठी करारही केला आहे. शिवाय ब्रिटनमध्ये ही लस नागरिकांना दिली जाणार आहे. तिसऱ्या चाचणीत ही लस 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारने या लसीच्या वापराला परवानगी दिली. पुढच्या काही आठवड्यात ही लस ब्रिटनच्या नागरिकांना टोचलीही जाईल. तब्बल 3 हजार रुपयांना ही लस मिळण्याचा अंदाज आहे.
03. अमेरिकेची महागडी मॉर्डना लस
मॉडर्ना ही अमेरिकेची कंपनी कोरोनाची लस बनवली आहे. नावाप्रमाणेच ही लसही मॉर्डन आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 94.5 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही लस 25 ते 30 डॉलर म्हणजेच तब्बल 1800 ते 2700 रुपयांच्या दरम्यान असू शकते. कोरोनाने ज्यांची तब्येत जास्त बिघडली आहे, त्यांच्यासाठी ही लस संजीवनी असेल, असा कंपनीचा दावा आहे. (Corona Vaccination Program soon to be finalized know A to Z information about price and date)
04. चिनीमधून सुरु झालेल्या कोरोनावर चीनची लस-
चिनी वस्तू घ्यायच्या नाहीत, असं आपण म्हणतो, पण पर्यायच नसेल आणि चिनी लस कोरोनावर प्रभावी असेल तर? म्हणूनच चिनी कंपन्यांचाही विचार करावा लागेल. सायोनोफार्म ही चिनी कंपनीही लस बनवत आहे, जी आता तिसऱ्या टप्प्यात आहे. पण चिनी वस्तू जशा स्वस्त असतात. तशी ही लस काही स्वस्तात मिळणार नाही. तुम्ही फ्रीज, टीव्ही किंवा इतर महागडं सामान घेण्याच्या बेतात असाल, तर तो विचार तुम्हाला बदलावा लागू शकतो. कारण याच किंमतीत ही लस मिळेल, या लसीची किंमत तब्बल 10 हजारांच्या घरात जाऊ शकते. आता 10 गुणिले तुमच्या घरातील माणसं मोजा, म्हणजे बजेट काय ते कळेल! पण असं असलं तरी भारतात अगदी मोफत लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला इतर कुठल्या कंपनीच्या लसीसाठी खिसा रिकामा करावा लागणार नाही.
निवडणुकीप्रमाणे कोरोना महालसीकरण मोहीम!
भारतात लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर कोरोना महालसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डातल्या प्रत्येक शाळेत आणि सरकारी संस्थांमध्ये लसीकरणाचे बूथ उभारले जातील. ज्या बूथवर जाऊन तुम्हाला लस टोचून घ्यावी लागेल. यावेळी ऑनलाईन पद्धतीचाही अवलंब होऊ शकतो, आणि ऑनलाईन टोकन घेतल्यानंतरच तुम्हाला तुमच्या जवळच्या कोरोना बूथवर लसीकरणासाठी जावं लागेल.
कुणाला पहिली लस टोचली जाईल?
लसीकरणामध्ये पहिलं प्राधान्य बूथपर्यंत पोहचू न शकणाऱ्या नागरिकांना असणार आहे. यामध्ये वयोवृद्ध, गंभीर स्वरुपाचे रुग्ण, अपंग व्यक्ती यांचा समावेश असेल. त्यानंतर कोरोना योद्ध्यांना ही लस दिली जाईल. यामध्ये कोरोना रुग्णांसोबत काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर पोलिसांसह इतर कोरोना योद्ध्यांनाही ही लस देण्यात येईल. आणि यानंतर सामान्य नागरिकांना बूथवर जाऊन ही लस घ्यावी लागणार आहे.
Prime Minister Narendra Modi addresses all-party meeting called by him to discuss the COVID-19 situation, through video conferencing. pic.twitter.com/nnJdMuIA46
— ANI (@ANI) December 4, 2020
संबंधित बातम्या :
भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात, पंतप्रधानांची खुशखबर, किंमत-लसीकरण प्लॅनचीही माहिती
Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार
(Corona Vaccination Program soon to be finalized know A to Z information about price and date)