पाटणा (बिहार) : भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे. मी दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवेन, मात्र पाकिस्तानाला धडा शिकवा, अशा भावना पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनी व्यक्त केल्या. शहीद जवान रतन ठाकूर यांचे वडील बिहारमधील भगलपूर येथे एएनआयशी बोलत होते.
शहीद रतन ठाकूर यांचे वडील काय म्हणाले?
“माझ्या मुलाने भारतमातेसाठी बलिदान दिलं आहे. मी माझ्या दुसऱ्या मुलालाही भारतमातेसाठी सैन्यात पाठवण्यासाठी तायर आहे. मात्र, पाकिस्तानला योग्य धडा शिकवा.”, अशा भावना शहीद रतन ठाकूर यांच्या वडिलांना व्यक्त केल्या.
CRPF Personnel Ratan Thakur’s (who lost his life in #PulwamaTerrorAttack ) father in Bhagalpur: I have sacrificed a son in Mother India’s service, I will send my other son as well to fight, ready to give him up for Mother India, but Pakistan must be given a befitting reply.#Bihar pic.twitter.com/rI6cM38Agh
— ANI (@ANI) February 15, 2019
पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (Jaish E Mohammed) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) नावाच्या दहशतवाद्याने हल्ला केला. आदिल हा पुलावामातील काकापोरा भागात राहत होता.
उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला
उरीमध्ये (Uri Attack) सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला. हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.
Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी
हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सैन्याकडून वाहतूक बंद करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. याशिवाय पुलवामा, शोपिया, कुलगाम आणि श्रीनगर जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. जखमी जवानांवर उपचार सुरु असून वरिष्ठ अधिकारीही घटनेवर नजर ठेवून आहेत.