नवी दिल्ली : आकाशातला सर्वात मोठा योद्धा पुढच्या चार दिवसात भारतीय वायुदलात दाखल होणार आहे (Dassault Rafale aircraft). राफेल वायुदलात सामील झाल्यानंतर त्यालाच भारतीय वायुदलाचं सर्वात आधुनिक विमान होण्याचा मान मिळणार आहे. राफेल विमान 29 जुलै रोजी दुबई मार्गाने भारतात दाखल होऊन भारतीय वायुदलाची शान वाढवणार आहे (Dassault Rafale aircraft).
चीनसाठी मोठी डोकेदुखी म्हणजे ही विमानं भारतीय हद्दीत दाखल होताच, त्यांना थेट अंबाला एअरबेसवर तैनात केलं जाणार आहे. या घडीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या वायुदलांकडे राफेलच्या तोडीचं एकही विमान नाही. त्यामुळेच राफेल विमानांना इतक्या तातडीनं सीमेवर तैनात केलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय वायुदलाकडे राफेल विमानांचे दोन स्कॉड्रन असणार आहेत. ज्यापैकी एक अंबालामध्ये तर दुसरा हासीमारा एअरबेसवर तैनात केले जातील. भारताचं हे पाऊल चीनसाठी सर्वात मोठं आव्हान बनणार आहे. कारण भारत ज्या ठिकाणी राफेल विमान तैनात करणार आहे, तिथून अगदी काही किलोमीटर अंतरावर चीनचे 3 अत्यंत महत्त्वाचे एअरबेस आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
काशगर, होटान, आणि नागरी हे तिन्ही चीनचे एअरबेस राफेलपासून फक्त काही किलोमीटर दूर आहेत. जर उद्या चीननं काही आगळीक केली, तर भारताची राफेल विमानं काही मिनिटात या तिन्ही एअरबेसवर हल्लाबोल करु शकतात. श्रीनगरपासून चीनचा काशगर एअरबेस 625 किलोमीटर लांब आहे. श्रीनगरपासून चीनचं दुसरं एअरबेस होटान हे सुद्धा 572 किलोमीटर दूर आहे. लेहपासून काशगर 615 किलोमीटर दूर आहे. लेहपासूनच होटान एअरबेस 384 किलोमीटर
आणि लेहपासून नागरी एअरबेससाठी फक्त 324 किलोमीटरचं अंतर कापावं लागणार आहे.
चीननं तिबेटच्या भागात उभी केलेली एअरबेस ही भारतासाठी चिंतेचा विषय होती. मात्र राफेल आल्यामुळे चीनचे सर्व
फासे उटले पडणार आहेत. कारण, वेग आणि हवेतून हवेत मारा करण्याच्या क्षमतेत राफेल सर्वात आघाडीवर आहे.
राफेलमध्ये लोड केलेली मिसाईल 150 किलोमीटरपर्यंतच्या कोणत्याही विमानाला जमीनदोस्त करु शकते.100 किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य राफेलच्या नो एस्केप झोनमध्ये येतं, म्हणजे 100 किलोमीटरच्या आतमधलं टार्गेट अचूकपणे टिपलं जातं. याशिवाय राफेलमध्ये एक 30 एमएमची गनसुद्धा आहे.
राफेलमध्ये हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी मिसाईल्स आहेत. महत्वाचं म्हणजे राफेलमध्ये अण्वस्रं सुद्धा लावले जाऊ शकतात, म्हणजेच राफेलद्वारे आण्विक हल्ला करण्याचीसुद्धा क्षमता आहे.
फ्रान्सकडून भारतानं 2016 मध्ये एकूण 36 राफेल विमानं घेण्याचा करार केला होता. त्यापैकी 5 विमानं भारतात दाखल होत आहेत. भारताला सध्या या विमानांची सर्वात जास्त गरज आहे. या पहिल्या खेपेनंतर दुसऱ्या खेपेत पूर्ण 31 विमानं भारताला दिली जाणार आहेत. त्या 31 विमानांमध्ये 6 विमानं ही ट्रेनिंगसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे. तूर्तास फक्त ही 5 विमानंच चीनचा थरकाप उडवण्यासाठी पुरेशी आहेत.