केंद्राची कोणतीच अट नाही, मग रेशनसाठी राज्याच्या अटी का? कार्ड असो-नसो धान्य द्या : फडणवीस

| Updated on: Apr 03, 2020 | 3:35 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व गरिब जनतेला मोफत धान्य द्यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे (Devendra Fadnavis demand ration for all).

केंद्राची कोणतीच अट नाही, मग रेशनसाठी राज्याच्या अटी का? कार्ड असो-नसो धान्य द्या : फडणवीस
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे (Devendra Fadnavis demand ration for all). या लॉकडाऊनदरम्यान गरीब आणि होतकरु कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून मोफत धान्याचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र, राज्य सरकारने अनेक अटी ठेवल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला (Devendra Fadnavis demand ration for all).

“आगामी 3 महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरुपाच्या या अटी आहेत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या अटी मागे घ्याव्यात. आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत”, असे फडणवीस म्हणाले.

“केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, 3 महिन्यांसाठी आवश्यक धान्यापैकी 90 टक्के कोटा उपलब्ध झाला आहे. उर्वरित 2 दिवसात तो उपलब्ध होईल. त्यामुळे 3 महिन्यांचे धान्य राज्य सरकारने एकत्र द्यावे”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.