सेनेगल (आफ्रिका) : कुख्यात गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी (Ravi Pujari) सेनेगल पोलिसांना चकवा देत दुसऱ्या देशात पळाला आहे. 21 जानेवारी 2019 रोजी रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशातील पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने रवी पुजारीला जामीन दिला होता. मात्र त्यांनी त्याने सेनेगलमधून रस्त्याच्या मार्गाने दुसऱ्या देशात पळ काढण्यात यश मिळवलं आहे. या वृत्ताला सेनेगल सरकारकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. इंग्रजी वृत्तपत्र ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
सध्या भारताच्या ताब्यात असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनही अशाच प्रकारे 2000 साली बँकॉकमधून पळाला होता. त्यामुळे रवी पुजारीने छोटा राजनचीच आयडिया वापरल्याची चर्चा सुरु झाली आहे.
रवी पुजारीविरोधात 200 गुन्हेगारी प्रकरणं
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. एकट्या भारतात रवी पुजारीविरोधात 200 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये रवी पुजारी भारताला हवा आहे. फसवणूक, खंडणी, हत्या असे अनेक गंभीर गुन्हे रवी पुजारीवर दाखल आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांसह उद्योगपतींना धमक्या देण्याचा आरोपही रवी पुजारीवर आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रवी पुजारी बोगस नावाने ठिकठिकाणी राहत असे. अँथनी फर्नांडीस नावानेही तो वावरत होता. तसेच, दक्षिण आफ्रिकेतील बुर्किना फासो देशाचा नागरिक असल्याचा दावा रवी पुजारी करत असे.
रवी पुजारीची शक्कल
रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सर्व प्रकारची तयारी केली होती. मात्र, रवी पुजारीने शक्कल लढवली आणि सेनेगलमध्ये फसवणुकीचा गुन्हा स्वत:वर दाखल करुन घेतला. जेणेकरुन या प्रकरणात सेनेगलमध्ये सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याला भारतात आणले जाऊ शकत नाही. कारण कुणीही व्यक्ती परदेशात कुठल्या प्रकरणात अटक असेल, तर त्यावरील संपूर्ण प्रकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याला दुसऱ्या देशात पाठवले जात नाही.
रवी पुजारीने छोटा राजनची आयडिया वापरली?
सेनेगल कोर्टाने गेल्याच आठवड्यात रवी पुजारीला जामीन दिला होता. त्यावेळी देश सोडून न जाण्याचे आदेशही कोर्टाने पुजारीला दिले होते. कोर्टाने रवी पुजारीला जामीन दिल्यानंतर, भारतीय सुरक्षा यंत्रणांची चिंतही वाडली होती. ज्याप्रकारे 2000 साली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन बँकाँकमधून पळाला होता, तसाच रवी पुजारी पळेल, अशी शंका भारतीय सुरक्षा यंत्रणांना होतीच. भारतीय सुरक्षा यंत्रणांची शंका आता खरी ठरण्याची शक्यता आहे.
बुर्किनो फासो, माली आणि आयव्हरी कोस्ट यांसारख्या छोट्या-छोट्या देशांसारखाच सेनेगल छोटा देश आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने पळणं रवी पुजारीला सहज शक्य होते.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, दोन अधिकाऱ्यांची एक टीम दिल्लीहून सेनेगलच्या दिशेने रवाना झाली आहे.