नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सीएए हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाहीत”, असं स्पष्टीकरण डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. ट्रम्प मंगळवारी (25 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते (Donald Trump on CAA).
“नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झालेली नाही”, असंदेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना सीएएवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत विचारले असता, “मी याबाबत ऐकलं आहे. मात्र, या विषयावर आम्ही चर्चा केलेली नाही”, असं ट्रम्प यांनी उत्तर दिलं.
“आम्ही धार्मिक स्वातंत्र्याबाबत चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक स्वातंत्र्यावर विश्वास करतात”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं (Donald Trump on CAA).
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आणि समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसाचाराचं वेगळं वळण लागलं आहे. सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात समोरासमोर दगडफेक होत आहेत. या हिंसाचारामुळे दिल्ली धुमसत आहे. यात काही जणांना बळीदेखील गेल्याची माहिती मिळत आहे. या दंगलीत एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील आले आहेत. ट्रम्प कुटुंबाचं काल (24 फेब्रुवारी) मोठ्या जल्लोषात अहमदाबाद विमानतळावर स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोठा रोड शो काढण्यात आला. त्यानंतर ते साबरमती आश्रमात गेले आणि नंतर सरदार वल्लभाई स्टेडियम येथे मोठी सभा झाली. त्यानंतर रात्री ट्रम्प यांनी दिल्लीत एका अलिशान हॉटेलमध्ये मुक्काम केला. आज दिवसभर राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.