आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून कधी काळी ओळखली जाणाऱ्या मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे. धारावीकरांचा पुनर्विकास करताना पहिली पायरी असलेल्या सर्वेक्षणाबाबत धारावीकरांच्या शंकाकुशंका दूर केल्या जात आहे. याचा एक भाग म्हणून धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टने (डीआरपी) जागरुकता अभियान राबवले आहे. यासाठी रहिवाशांच्या चौक सभा घेतल्या जात आहेत. तसेच धारावीकरांच्या मनातील शंकाचे निरसन करणे आणि प्रकल्पाबाबतची योग्य माहिती पोहचविता यावी यासाठी खास टोल फ्री क्रमांक जाहीर केला असून त्यासाठी कॉल सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.
धारावी प्रकल्पाबाबतील धारावीतील लोकांच्या मनातील शंकाचे निरसन करण्यासाठी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टने (डीआरपी) जागरूकता मोहिमेला सुरुवात केली आहे.सध्या धारावीत सुरू असलेल्या नागरिकांच्या सर्वेक्षणाबाबत योग्य माहिती देऊन विविध गैरसमज दूर करण्याचे काम डीआरपीचे अधिकारी करीत आहेत. त्यासाठी खास समर्पित कॉल सेंटरची उभारणी केली आहे. तसेच या कॉल सेंटरमधील 10 टेलीकॉलर्स मराठी, हिंदी, तामिळ, गुजराती आणि इंग्रजी भाषेतून रहिवाशांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या सर्व शंकाचे समाधान करीत आहेत.
या प्रकल्पासाठीची पात्रता, सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारे दस्तावेज आणि पुनर्विकासात रहिवाशांचा हक्क या विषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी धारावी करांसाठी खास टोल फ्री क्रमांक जारी केलेला आहे. या पुनर्वसन प्रकल्पाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी धारावीकरांनी 1-800-268-8888 या टोल फ्री क्रमांकाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.जास्तीत जास्त रहिवाशांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी आम्ही जास्तीत जास्त कॉल्स करण्याचा प्रयत्न करत आहोत.आपल्या मनातील सर्व शंका दूर करण्यासाठी रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डीआरपी – एसआरएमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
या सर्वेक्षण प्रक्रियेत रहिवाशांचे दस्तावेज गोळा करण्याचे किचकट काम सुरु आहे. सर्वेक्षण अधिकारी रहिवाशांच्या दस्तावेजांचे फोटो काढून रहिवाशांनी स्वप्रमाणित केलेल्या प्रती पुढील कारवाईसाठी कार्यालयात पाठवतात. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अधिकाऱ्यांकडून रहिवाशांना सर्वेक्षण पावती देण्यात येत आहे.मात्र,रहिवाशांच्या या माहितीचा दुरुपयोग होत असल्याचा अपप्रचार काही लोकांकडून केला जात आहे. मात्र ,हे दस्ताऐवज स्कॅन करून त्यांचे सुरक्षित जागी जतन केले जाते. त्यामुळे या दस्तावेजांच्या दुरुपयोगाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या दस्तावेजांचा वापर केवळ सर्वेक्षण आणि पुनर्विकास प्रक्रियेसाठीच केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा पहिली सर्वेक्षणाची पायरी सुरु करताना अनेक पूर्व तयारी केली जात आहे.एखाद्या समुदायातील प्रभावशाली व्यक्ती शोधणे, रहिवाशांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी छोटेखानी सभांचे आयोजन करणे, माहितीपर पत्रकांचे वाटप करणे, अशा अनेक प्रक्रिया राबविल्या जात आहेत. सर्वेक्षण होणार असेल त्याठिकाणी सर्वेक्षणाची नोटीस आणि पोस्टर्स लावून रहिवाशांना त्याबाबत अवगत केले जाते आजवर धारावीतील विविध सेक्टर मधील सुमारे 79000 गल्यांमधील 70000 हून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.