मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची विधानपरिषेदवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषेदवर लवकरच राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे एकनाथ खडसे यांच्या विधानपरिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. एकनाथ खडसे यांच्यासारखा अभ्यासू आणि फर्डा वक्त विधानपरिषेद गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची सभागृहातील बाजू आणखीनच भक्कम होईल. (Eknath Khadse may appointed as MLC member )
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काँग्रेसकडून सत्यजित तांबे, नसीम खान, रजनी पाटील आणि सचिन सावंत यांच्या नावांची शिफारस केली जाऊ शकते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे, उत्तमराव जानकर या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची तारीखही आता निश्चित झाली आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी आपल्या व्हॉटसअॅपला तसे स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
विधानपरिषद निवडणूक
महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.
17 ऑक्टोबरला एकनाथ खडसेंकडून राजकीय घटाची पुनर्स्थापना?; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा
(Eknath Khadse may appointed as MLC member)