नवी दिल्ली: गेल्या नऊ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. नऊ दिवस झाले तरी सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. (Farmer leaders call for Bharat Bandh on 8 Dec)
गेल्या नऊ दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकार आम्हाला कमी लेखत आहे, असा संताप व्यक्त करतानाच सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध म्हणून येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला. सरकार कायद्यात दुरुस्ती करण्यास तयार आहे. एमएसपीवर कायदा बनवायलाही सरकार तयार आहे. पण आम्हाला हा कायदाच नकोय. हा कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वानुमते 8 डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
गेल्या नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्याविरोधात ऋषभ शर्मा नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवी दिल्ली आणि नोएडा परिसरात कोरोनाचा धोका असल्याने शेतकऱ्यांना आंदोलन संपवायला सांगा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
उद्या 5 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दिल्ली-गाजीपूर बॉर्डरवर तिन्ही कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्या शनिवारी अंतिम फैसला झाला नाही तर दिल्लीतील रस्ते बंद करण्यात येईल. तसेच दिल्लीतील भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विक्रीची दुकानेही बंद करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (Farmer leaders call for Bharat Bandh on 8 Dec)
50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4 December 2020https://t.co/CtbcBpv27B#SuperFastNews #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2020
संबंधित बातम्या:
भाजपला शेतकरी आंदोलनाचा झटका; हरियाणात खट्टर सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची काँग्रेसची घोषणा
हम करे सो कायदा’ चालणार नाही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले; शिवसेनेचा हल्लाबोल
शेतकऱ्यांचा बाणेदारपणा, सरकारचं जेवण नाकारलं; म्हणाले, ‘आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय’