पालघर: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत कृषी कायद्याला विरोध करतानाच पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात आज ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. घोषणाबाजी करत या आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केलं. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापलं आहे. (Farmers Protest in all over Maharashtra to Support Delhi protest against Farm Laws)
गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने देशभरातील शेतकरीही संतप्त झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध नोंदवत जोरदार आंदोलन केलं. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथे किसान काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी वाडा-भिवंडी मार्गावर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी भाजप सरकारच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलं. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट उडाली. त्यामुळे या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही वेळानंतर मोजक्याच कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केलं.
केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा नेला. या मोर्चात शेतकरी कुटुंबकबिल्यासह उपस्थित झाले होते. यावेळी कृषी विधेयक मागे घेण्याची जोरदार मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, या संतप्त आंदोलकांना तहसील कार्यालयाच्या गेटवरच रोखण्यात आलं. त्यामुळे आंदोलकांनी तहसीलच्या गेटवर बसूनच जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. या ठिकाणी पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, पालघरमध्येच काँग्रेस, कष्टकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन केलं.
सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सोलापुरातील संत तुकाराम चौकात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रास्तारोको केल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आडम यांच्यासह माकपच्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं होतं. संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरच झोपून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आडाम यांनी पोलिसांकडून आंदोलकांची मुस्काटदाबी सुरू असल्याचा आरोप केला.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय व सीटू यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली २०००हून अधिक शेतकऱ्यांनी शहापूर एसटी स्टँडवरून मोर्चा काढला. यावेळी शहापूरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पंचायत समितीसमोर जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि तहसील समोर उग्र निदर्शने करण्यात आली.
भाजपचे मोदी सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी कायदे मागे घ्या, वीज विधेयक मागे घ्या, सर्व शेतकरी-शेतमजुरांची कर्जमुक्ती करा, सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या, वनाधिकार कायद्याची कसून अंमलबजावणी करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, तसेच शहापूर तालुक्यातील नेते भरत वळंबा, कृष्णा भावर, सुनील करपट, नितीन काकरा, भास्कर म्हसे, सुनीता ओझरे, निकिता काकरा, कमल वळंबा, विजय विशे इत्यादींनी केले.
उस्मानाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शांततेत आंदोलन केलं. या आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं.
नाशिकमध्ये आज दुपारी शेतकरी समन्वय समितीचा एल्गार पाहायला मिळाला. समन्वय समितीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली. यावेळी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांनी नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. तर, प्रहार संघटनेने केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप व्यक्त केला. दिल्लीत शेतकरी मरायला आले आहेत का? असा सवाल कटारिया यांनी केला होता. त्यावर प्रहार संघटनेने जोरदार आक्षेप घेतला असून कटारीयांना त्यांचं वक्तव्य महागात पडणार असल्याचा इशारा दिला. (Farmers Protest in all over Maharashtra to Support Delhi protest against Farm Laws)
नाशिकमध्ये किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करून हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल रात्रीपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली आहे.
इचलकरंजीमध्येही आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आसूड कडाडला. काँग्रेस, जय किसान शेतकरी संघटना आणि माकपाने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. माकपाने के.एल. मलाबादे चौकात निदर्शने करत रास्ता रोको केला. माकपच्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकार चले जावच्या घोषणा देत जेलभरो आंदोलनही केलं.
शेतकरी आंदोलनात केंद्र सरकार फूट पाडण्याचं काम करत असून हे आंदोलन दडपण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप कामगार नेते डॉ. अजित नवले यांनी केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मन की बात समजून घेतली नाही तर संपूर्ण देशात शेतकऱ्यांचं आंदोलन पसरू शकतं, असा इशाराही डाव्यांनी दिला आहे.
नगरमध्येही शेतकऱ्यांनी तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतानाच केंद्राने हा कायदा मागे घेण्याची जोरदार मागणी केली. नगर जिल्ह्यातील अकोले येथेही आंदोलनाचा हा वणवा पाहायला मिळाला. यावेळी आंदोलकांनी शेतमाल रस्त्यावर ओतून संताप व्यक्त केला. विकत कशाला? फुकट घ्या… अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी त्यांचा माल रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदवला.
शेगावमध्ये भाकप आणि किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शेगावच्या क्रांती चौकात हजारो शेतकऱ्यांनी एकवटून मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच दिल्लीतील आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलकांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
काँग्रेसने आज सकाळापासूनच नागपुरात आंदोलन करून संपूर्ण वातावरण ढवळून काढलं. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाली होते. शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात आक्रमक भूमिका घेत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारचे पोस्टर जाळले. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अकोल्यातही शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचं धरणे आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. दिल्लीत धडक दिलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू केल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीने नागपुरात आंदोलन सुरू केलं आहे. नागपूरच्या संविधान चौकात हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून हा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (Farmers Protest in all over Maharashtra to Support Delhi protest against Farm Laws)
VIDEO : Palghar | वाडा खंडेश्वरी नाका येथे केंद्र सरकारविरोधात किसान काँग्रेसचं आंदोलन #Palghar #Wada #Farmer pic.twitter.com/K3HfhxzlMK
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 3, 2020
संबंधित बातम्या:
दिल्लीनंतर महाराष्ट्रातही शेतकरी संघटनांचा राज्यव्यापी एल्गार, 3 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार
शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? राजू शेट्टी कडाडले
(Farmers Protest in all over Maharashtra to Support Delhi protest against Farm Laws)