गोंदिया : ऐन पावसाळ्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात विहिरीतील पाणीपंप दुरुस्ती करताना विषारी वायूने चौघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (People died due to toxic gas in Gondia). ही घटना पानगाव येथे घडली. भांडारकर कुटंबीयांच्या अंगणात असलेल्या विहिरीतील पाण्याचा पंप खराब झाला होता. पंप सुरु होत नसल्याने एकजण पंपात पाणी भरण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, विहिरीतील विषारी वायूमुळे तो गुदमरला. त्याला वाचवण्यासाठी इतर तिघेजण विहिरीत उतरले. मात्र, त्यांचाही या विषारी वायूने गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
पानगावातील आत्माराम भांडारकर यांनी आपल्या घरासमोर एक विहिरी खोदली. त्या विहिरीचं वास्तूपूजन होतं. त्यामुळे आत्माराम भांडारकर यांचा 32 वर्षीय झणकलाल भांडारकर हा विहिरीतील पंपामध्ये पाणी भरण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, बराचवेळ होऊनही झणकलाल विहिरीच्या बाहेर न आल्याने त्याचे वडील आत्माराम भांडारकर हे विहिरीत उतरले. मात्र, तेही बराचवेळ बाहेर आले नाही आणि कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आत्माराम यांचा 36 वर्षीय पुतण्या राजू भांडारकर विहिरीत उतरला. मात्र, तोही विहिरीत जाऊन बाहेर आलाच नाही. अखेर त्यांच्या घराशेजारी असलेले 50 वर्षीय धनराज गायधने या तिघांना शोधण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र, तेही विहिरीत उतरल्यानंतर बाहेर आलेच नाही.
या धक्कादायक प्रकारानंतर भांडारकर कुटुंबाने याची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचत विहिरीची तपासणी केली. तेव्हा विहिरीतून वास येत असल्याचं लक्षात आलं. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाने शोध घेतल्यानंतर विहिरीत 4 मृतदेह आढळले. या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आमगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सालेकसा पोलीस या घटनेचे इतर कंगोरे देखील तपासत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकऱ्यांना जुलैअखेरपर्यंत कर्जमाफी, सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा
लॉकडाऊनचा फटका, पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर
People died due to toxic gas in well in Gondia