कोरोनाच्या महामारीला कायमचं संपवण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक देश वेगवेगळ्या पातळीवर कोरोनाची लस तयार करण्यात गुंतला आहे. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एक आनंदाची बातमी दिली आहे.
'आपल्या सगळ्यांना लसीची आवश्यकता आहे आणि या वर्षाच्या अखेरीस आपल्याकडे कोरोनावर मात करण्यासाठी लस असेल अशी आम्हाला आशा आहे' असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
डब्ल्यूएचओच्या नेतृत्वात कोवाक्स ग्लोबल लस सुविधेमध्ये सध्या 9 लसींवर प्रयोग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.
कोवाक्स आणि गवी (GAVI) लस ही एकत्र करून कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे कोवाक्ससोबत करार करणाऱ्या देशांना नवी लस मिळणार आहे. आतापर्यंत 168 देशांनी कोवाक्ससोबत करार केला आहे. तर चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यामध्ये समावेश नाही.
GAVI लसीच्या बोर्डाने सगळ्यात आधी 92 कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना लसीचं वितरण, तांत्रिक सहाय्य आणि कोल्ड चेन उपकरणासाठी 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. युरोप औषध नियामक फायझर इंक आणि बायोनॉटॅक यांनी हल्लीच त्यांच्या प्रायोगिक लसीचं परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने कोरोना व्हायरस लस विकसित करणाऱ्यांना सांगितलं आहे की, प्रायोगिक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी किमान दोन महिन्यांचा सुरक्षितता डेटा आवश्यक असणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ते त्यांच्या लसीसाठी मान्यता देतील असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे.
खरंतर, जगात प्रत्येक 10 वा व्यक्ती कोरोना संक्रमित असू शकतं असा इशारा याआधी WHO ने दिला आहे. इतकंच नाही तर भविष्यात कोरोनाचा धोका आणखी वाढेल असंही WHO कडून सांगण्यात आलं होतं.