मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून पुन्हा पवारांवर निशाणा साधला आहे. पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका, हे मी आधीपासूनच सांगत आहे. 50 वर्ष हे कर्मचारी तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत, मान्यता प्राप्त युनियन ही पवारांची आहे, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राजकारण पुन्हा तापले आहे.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात विलीनीकरणाचा उल्लेख का?
गोपीचंद पडळकरांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. अजित पवार यांना विलीनीकरण शक्य नाही हे माहीत होते तर राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात का उल्लेख केला होता? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्या पाठीमागे कर्मचारी राहिले त्यांनी आज कर्मचाऱ्यांचा घात केला, असा आरोप त्यांनी पवारांवर केला आहे. त्यामुळे पुन्हा पडळकर विरुद्ध पवार संघर्ष पहायला मिळत आहे. आम्ही आंदोलन करता होतो तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादीवाले म्हणत होते आम्ही कर्मचाऱ्यांना भडकवत आहोत, आम्ही विरोधाला विरोध करणारे नाही, असेही पडळकर म्हणाले आहेत.
यांचा खरा चेहरा कळला
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज यांचा खरा चेहरा कळला आहे. हे सर्व सरकारचे अपयश आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, यांची प्रत्येक ठिकाणी संघटना आहे, अशी खरपूस टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अधिवेशनातही एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पहायला मिळाले. सरकार पळ काढत आहे, सरकार यावर बोलायला तयार नाही, उत्तरे द्यायला तयार नाही, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाज्योती संस्थेतही गोंधळ आहे
विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी महाज्योती संस्था तयार केली. पण त्यात गोधळ आहे, अजून एकही वसतिगृह यांनी उभारलेले नाहीये. सारथी, महाज्योती आणि बार्टीसाठी वेगवेगळे पेपर घेत आहेत, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सारथीमध्ये आणि महाज्योतीमध्ये कुणबी आणि मराठा समाज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.