नाशिक : सोनसाखळी चोरांना (Chain Snatching) आवरण्याचं मोठं आव्हान संपूर्ण राज्यातील पोलिसांसमोर (Maharashtra Police) आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) पोलिसांनी केलेल्या एका कारवाई सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली आहे. चांदवड (Chandwad) तालुक्यातील शिकावू ग्रामसेवक सोनसाखळी चोर (Theft) निघाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गंगापूर (Gangapur) पोलिसांनी या चोरट्याला अटक केली असून, त्यानं सोनसाखळी चोरीचं पाऊल का उचललं होतं, याचा उलगडाही केलाय.
ग्रामसेवक ते सोनसाखळी चोर
परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते, हा एखादा फिल्मी डायलॉग वाटू शकेल. पण नाशिकच्या चांदवड तालुक्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत जे समोर आलंय, त्यानं हा डायलॉग खराही ठरू शकतो, यावर शिक्कामोर्तब झालंय. सोनसाखळी चोरीप्रकरणी विपुल रमेश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 5 लाखांचं 11 तोळं सोनं आणि दुचाकीही जप्त केली आहे. शिकाऊ ग्रामसेवक असणारा विपुल सोनसाखळी चोर का बनलाय, हे देखील चौकशीतून उघड झालंय.
महामारीनं चोर बनवलं?
विपुल पाटीलनं कोविड महामारीच्या काळात 14 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते फेडण्यासाठी त्यानं चोरीचा मार्ग स्वीकारल्याचा संशय पोलिसांना आहे. विपुल हा अमृतधाम भागात राहणारा असून तो सुट्टीच्या दिवशी नाशिक शहरात हिंडायचा. नाशकातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्यांवर हात साफ करण्याचं काम करणाऱ्या विपुलच्या मागावर पोलिस अनेक दिवसांपासून होते. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या हाती कसा लागला?
सोनसाखळी चोऱ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारींपैकी एक तक्रार गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर पोलीसही तपासाला लागले. पोलिसांनी आपल्या माणसांना कामाला लावून चोरीच्या वर्णनाची माहिती दिली होती. त्यातून एका पोलीस मित्राला सीसीटीव्हीत एक संशयित सावरकर नगर हद्दीत फिरताना आढळला होता. विशेष म्हणजे तो ज्या दुचाकीवरुन फिरत होता, त्यावर नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला होता. ही गोष्ट वरीष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी सापळा रचून तत्काळ संशयिताला गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरातून अटक केली.
अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी विपुलची कसून चौकशी केली. या चौकशीनंतर विपुलनं आपल्या गुन्ह्याची कबुलीदेखील दिली. गंगापूर पोलीस स्थानकच्या हद्दीत विपुलनं पाच सोनसाखळ्या चोऱ्या केल्या होत्या. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या संपूर्ण प्रकरणी पत्रकारांशी बोलताना माहिती दिलीये. दरम्यान, आता त्याची आणखी कसून चौकशी केली जातेय. त्यानं अजून कुठं-कुठं चोऱ्या केल्या होत्या, याचा पोलिसांकडूनही आता शोध घेतला जातोय.
संबंधित बातम्या –
Flipkart Big Saving Days : Micromax च्या नवीन स्मार्टफोनवर शानदार डिस्काऊंट
Ajit Pawar : चार दिवस सासूचे असतात, चार दिवस सुनेचे’; अजित पवारांचा निशाणा
अवकाळीचा परिणाम : द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी 20 हजाराचा खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी