औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा (Harshvardhan Jadhav Allegations) त्यांचे सासरे आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावरही आरोप केले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघी मिळून आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला (Harshvardhan Jadhav Allegations).
हर्षवर्धन जाधव यांनी यूट्यूबवर व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्यांनी रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे यांच्यासोबत भाजप आणि शिवसेनेवरही सडकून टीका केली. “खरंतर घरचे विषय बाहेर मांडणं चुकीचं आहे. पण मांडल्याशिवाय आपलं दु:ख कुणालाही कळणार नाही”, असंदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन वेडा आहे हे सिद्ध करायचा विडा उचलला आहे. एकदा हे सिद्ध झालं तर मग तो काहीही बोलला तरी फरक पडणार नाही, असं त्यांचं षडयंत्र सुरु आहे”, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.
“माझ्या आयुष्यात मी कधीही इतकी वाईट परिस्थिती पाहिली नाही. मला वेडं म्हणण्याअगोदर आपण रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्याकडे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की, ते माझ्यापेक्षा दहापट वेडे आहेत”, असा घणाघात हर्षवर्धन जाधव यांनी केला.
हर्षवर्धन जाधव व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?
लॉकडाऊन सुरु असताना स्थलांतरित मजूर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असताना त्यांना जेवायला मिळत नव्हतं. अनेक ठिकाणी रेशन दुकानात जवळपास 75 टक्के अन्नधान्य गायब होतं. इतकी वाईट परिस्थिती असताना, लोकं मरत असताना, आपल्या देशाचे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे, ज्यांची जबाबदारी आहे की, हे सर्व व्यवस्थित पार पाडावं, ते जावायाला वेडं ठरवण्यात व्यस्त होते. कारण त्यांना आपल्यावरचे आरोप फेटाळायचे आहेत.
तुम्ही जावायास वेडं ठरवून काय मिळवणार आहात? माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अनेक डॉक्टरांना संपर्क केला. दिवसाच्या 24 तासांपैकी त्यांचे 18 तास हर्षवर्धन जाधववर जात आहेत. जावायला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करणं हे शहाणपणाचं काम आहे का? घरात चार भींतीत बसून गोष्टींवर तोडगा काढण्यापेक्षा उलटं काम करायचं?
जावई म्हणतोय माझं घरदार, राजकारण, आमदारकी घ्या, सगळं द्यायला तयार आहे. तरीही तुम्ही त्याला वेडं सिद्ध करण्यासाठी त्याच्या पाठिमागे लागले आहात. खरंतर हाच तुमचा सर्वात मोठा वेडेपणा आहे.
मी दानवेंना परत एकदा हात जोडतो. कृपया तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या. मी शेवटचं सांगतोय. दानवेंनी मी वेडा असल्याचं सर्टिफिकेट आणण्याचा प्रयत्न करु नये, कारण मी वेडा नाही. पण लोकांना तुमची प्रमाणपत्र देत फिरु नका. तुमचं वेडेपणा थांबवा. हे मीटवा. घरातील गोष्टी घराबाहेर जावू नये. पण दुर्देवाने तुम्ही त्या घराबाहेर घातल्या. त्याचं खापर तुम्ही माझ्यावर फोडत आहात. उलट मलाच वेडं ठरवत आहात.
मला असं वाटतंय की, चार भींतीत मतभेद मिटवा. तरीही तुम्हाला हर्षवर्धनला वेडं ठरवायचं असेल तर जे होईल ते बघितलं जाईल. मला नैराश्य निश्चित आलं होतं. आत्महत्या करण्याचा विचार आला होता. पण माझ्या सगळ्या मित्रांनी प्रेम दिलं, माझ्याबरोबर कुणीतरी आहे याची जाणीव झाली. खूप लोकं माझ्यासोबत प्रेमाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अन्यायाविरोधात लढणार.
चंद्रकांत खैरेंवर टीका
“महामृत्यूंजयचा जप केला तर कोरोना होणार नाही, असं चंद्रकांत खैरे म्हणाले होते. खैर मला वेडं म्हणतात. माझ्या वेडेपणाचं सर्टिफिकेट आहे, असं म्हणतात. पण खैर आपल्या तोंडानेच वेडेपणाचं सर्टिफिकेट देत आहेत”, अशी टीका हर्षवर्धन यांनी केली.
“महामृत्यूंजय जपाने कोरोना जात असेल तर तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का सांगत नाहीत? मुख्यमंत्र्यांना तुम्ही हे सांगितलं आणि त्यांना ते पटलं तर आमचे डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस यांचे हाल होणार नाहीत. आज पोलीस परेशान आहेत. त्यामुळे मला वेडं म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वत:चं आत्मपरिक्षण करावं”, असं हर्षवर्धन म्हणाले.
भाजपवरही टीका
“कुणी कुणाला काय म्हणायचं हे ठरवायची वेळ जर आली तर मी तुम्हाला निक्षून सांगतो, सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहिली तर सर्वात मोठे वेडे कुठे बसले आहेत, हे मी सांगायची आवश्यकता नाही. भाजपने आयुष्यभर राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलं. हे दिवस आपण पाहिले आहेत”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.
“अचानक सकाळी सहा वाजता शपथविधी? भाजपचा मुख्यमंत्री? ज्याला हे जेलमध्ये टाकणार होते तो इसम उपमुख्यमंत्री? हे शहाणपण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजप जाते तरी कशी? हे सरकार ज्यावेळेला तुटलं तेव्हा ते पुन्हा अजित पवार यांच्यामागे लागले. हा वेडेपणा नाही?”, असा सवाल हर्षवर्धन जाधव यांनी केला.
शिवसेनेवरही टीका
“तुम्ही मला वेडे करायला निघाले. आधी तुमच्या वेडेपणाकडे बघा. शिवसेनाही काही कमी नाही. शिवसेनेने आयुष्यभर काँग्रेसला शिव्या घातल्या. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. हा वेडेपणा नाही? नेमकं वेडे कोण आहेत? तुम्ही राजकारणी वेडे आहात की आम्ही लोकं वेडे आहोत? पण लोकं वेडे नाहीत. कारण ते वेडे असते तर त्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. तुम्ही निवडून आल्यानंतर वेडेपणा करणार आणि त्याचं खापर माझ्यावर फोडणार असाल कारण मी तुमच्या मर्मावर हात ठेवतो, तर कुणीतरी थांबायला हवं”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.
कोण आहेत हर्षवर्धन ?
संबंधित बातम्या :
रावसाहेब दानवेंमुळे आत्महत्या करण्याची वेळ, हर्षवर्धन जाधवांचा सासऱ्यांवर गंभीर आरोप
संजनाकडून प्रश्न सोडवून घ्या, हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला रामराम, उत्तराधिकारीही जाहीर