न्यूयॉर्क : भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा, बंधनं शिथिल करण्याची घाई करु नये, असा सल्ला जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नल ‘द लान्सेट’चे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी दिला आहे. (Health journal editor Richard Horton suggests extending 10 weeks Lockdown in India)
‘प्रत्येक देशातील ‘कोरोना’ची साथ कायमस्वरुपी राहणार नाही. आपले देश ‘कोरोना’चा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी योग्य तेच करत आहेत. भारतात जर लॉकडाऊन यशस्वी झाले, तर आपल्याला 10 आठवड्यांच्या कालावधीत यामध्ये घट दिसून येईल. जर व्हायरस रोखता आला, तर गोष्टी सामान्य होऊ शकतात. अगदीच सामान्य नाही, आपल्याला शारीरिक अंतर राखून ठेवावे लागेल, मास्कही घालावे लागतील आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे लागेल’ असं मत रिचर्ड हॉर्टन यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.
प्रत्येक राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकार लॉकडाऊन आणखी वाढवायचा की नाही, याबाबत निर्णय घेणार आहेत. सुरुवातीला 25 मार्च ते 14 एप्रिल या 21 दिवसांच्या कालावधीसाठी भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. ‘कोरोना’चा संसर्ग वाढल्याने पंतप्रधानांनी लॉकडाऊनची मुदत आणखी 19 दिवसांनी वाढवली. म्हणजेच एकूण 40 दिवसांचा लॉकडाऊन भारतात पाळला जात आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय होईल.
‘आपल्याला अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे, हे मला समजतं. परंतु कृपया त्याची घाई करु नका. जर आपण लॉकडाऊन उठवण्याची गडबड केलीत, आणि जर तिथे कोरोना साथीची दुसरी लाट आली, तर ती पहिल्या लाटेपेक्षा आणखी भयंकर असू शकेल, अशी भीतीही रिचर्ड हॉर्टन यांनी व्यक्त केली.
“अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिशेने जावे लागेल. तुम्ही लॉकडाऊनसाठी इतका वेळ आणि मेहनत खर्ची केली आहे, ती वाया घालवू नका. शक्य तितका हा कालावधी पुढे वाढवा. 10 आठवड्यांपर्यंत न्या’ असं रिचर्ड हॉर्टन यांनी सुचवलं.
‘चीनमधील ज्या वुहानपासून ‘कोरोना’ला सुरुवात झाली, तिथे 23 जानेवारीपासून एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत 10 आठवड्यांसाठी अत्यंत कठोर लॉकडाऊन राबवण्यात आला. त्यामुळे कोरोना विषाणूवर ते मत करु शकले. ते आता पुन्हा सामान्य जीवन जगत आहेत. खरं तर, कुठलेही ‘साथीच्या रोगाचे वैज्ञानिक मॉडेल’ हेच दर्शवतात. आपण सामाजिक अंतर न पाळल्यास मोठ्या लोकसंख्येत वेगाने पसरते’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोना व्हायरस 10 आठवड्यांनंतर पसरणार नाही, कारण फारच कमी जणांमध्ये तेव्हा संसर्ग कायम असेल. 10 आठवड्यांच्या शेवटी, आपण सावधगिरी बाळगल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. लॉकडाऊनची कार्यक्षमता राखण्यासाठी चाचणी आणि संपर्क ट्रेसिंग करणे आवश्यक आहे’ असंही रिचर्ड हॉर्टन यांनी सांगितलं.
कोणत्या देशात किती दिवसांचा लॉकडाऊन?
आतापर्यंत जाहीर संपूर्ण लॉकडाऊनचा कालावधी (दिवसात)
स्पेन – 57
फ्रान्स – 56
इटली – 56
ऑस्ट्रेलिया – 50
बेल्जियम – 48
यूके – 46
पोर्तुगाल – 45
मलेशिया – 42
भारत – 40
आयर्लंड – 38
नेदरलँड्स – 37
स्वित्झर्लंड – 35
डेन्मार्क – 34
नॉर्वे – 33
जर्मनी – 28
आतापर्यंत जाहीर अंशत: लॉकडाऊनचा कालावधी (दिवसात)
चीन – 77
सिंगापूर – 56
ऑस्ट्रिया -45
यूएस – 45
पाकिस्तान – 38
ब्राझील – 29
टर्की – 04
Julian Peto, Nisreen Alwan et al argue that universal weekly testing could be key to a successful exit strategy from lockdown. This question demands the urgent attention of SAGE. https://t.co/gyeizTG9uB
— richard horton (@richardhorton1) April 17, 2020
(Health journal editor Richard Horton suggests extending 10 weeks Lockdown in India)