गडचिरोली : मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विदर्भाशी संपर्क तुटला आहे (Heavy Rain in Gadchiroli). पावसामुळे जिल्ह्यातील सात मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये नागपुर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग, छत्तीसगड-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग, आलापल्ली-आष्टी-चंद्रपूर मार्ग अशा तीन मुख्य मार्गांचा समावेश आहे. तर इतर चार मार्ग हे जिल्ह्यातील आहेत (Heavy Rain in Gadchiroli).
पाल, वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, दिना, इंद्रावती, पर्लाकोटा या सात नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. भामरागड तालुक्यात तर 128 गावांना महापुराचा फटका बसला आहे. या गावांमध्ये विघुत आणि दूरध्वनी सेवा खंडीत झाली आहे. तर 200 घरं पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.
राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, कोकण, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यात पुढील दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरात पुन्हा मुसळधार पाऊस, राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले
कोल्हापूर धरण क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार दरवाजे पुन्हा उघडले आहे. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे काल उघडले होते. कोल्हापूर जिल्ह्यात काल पावसाची उघडीप होती. मात्र खबरदारी म्हणून राधानगरी धरणातून काल 4 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
जळगावमध्ये हतनूर धरणाचे 32 दरवाजे उघडले
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर प्रकल्प क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरणाचे 32 दरवाजे पूर्ण उघडले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात 2 हजार 873 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु राहणार आहे. तापी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये अधर पूस धरणाचे 2 दरवाजे उघडले
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अधर पूस धरण हे सततच्या पावसाने 85 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे 2 दरवाजे उघडले आहेत. महागाव तालुक्यात आतापर्यंत 424 मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडला आहे. अधर पूस धरणातून 104 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे.
बीडमध्ये चार वर्षात पहिल्यांदा विक्रमी पाणीसाठा, जिल्ह्यातील 37 प्रकल्प ओव्हरफ्लो
चार वर्षात बीड जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झालं. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 144 प्रकल्पांपैकी 37 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यात 34 लघु आणि 3 मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. या पावसामुळे मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढला आहे. पाच वर्षात झालेल्या पावसामध्ये केवळ 2017 चा पाणीसाठा वगळता इतका पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील 638 मिलीमीटर इतकी पावसाची वार्षिक सरासरी आहे. आतापर्यंत 431 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा : राम मंदिरावरुन रोष, दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट, पकडलेल्या दहशतवाद्याचा मोठा खुलासा