कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली (Kolhapur sangli flood) जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात (Kolhapur Flood ) गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर गेली आहे. जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर 60 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
या गावांची वाहतूक पर्यायी वळवण्यात आली आहे. दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणातून 8540 क्यूसेक, दूधगंगा 11900 क्यूसेक तर तुळशी धरणातून 1011 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी, गगनबावडा, मलकापूर या कोकण परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शहरातील पंचगंगा, पुढे सांगलीजवळच्या कृष्णा नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मंदिरात पुन्हा पाणी शिरले. नृसिंहवाडी मंदिरात दक्षिण सोहळा पार पडला.
पंचगंगा आणि कृष्णा नदी पुन्हा पात्राबाहेर गेल्या आहेत. पंचगंगेची धोक्याची पातळी 43 फुटांवर आहे. मात्र गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने पाणीपातळी 55 फुटांपेक्षा अधिक पातळीवरुन वाहात होती.
सांगलीत सतर्कतेचा आदेश
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदीकाठावर पुराची धास्ती आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 28 फुटांवर पोहोचली आहे.
30 फुटांनंतर शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आणि मगरमच्छ कॉलनी या परिसरात पाणी शिरते. त्यामुळे लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
सांगलीतील आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच रहाणार असले, तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जावू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.
कोल्हापूर-सांगली महापूर
गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुके जवळपास दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पाण्याखाली होती. दोन्ही जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. शेकडो माणसं आणि हजारो जनावरांचा मृत्यू झाला. महापुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्ग बंद झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवत होता.
संबंधित बातम्या
पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, कोकणात मुसळधार, तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?
धाकधूक पुन्हा वाढली, कृष्णेची पातळी उंचावल्याने सतर्कतेचा इशारा
स्थिरस्थावर होत असलेल्या कोल्हापूरकरांना पुन्हा धाकधूक, पंचगंगेची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, मराठवाड्यासाठीही पुढील 48 तास महत्त्वाचे