नवी दिल्ली : दिल्लीत चार ते पाच अतिरेकी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात (High Alert in Delhi) असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. या अतिरेक्यांचा दिल्लीत मोठा घातपात घडवण्याचा बेत आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणेकडून माहिती येताच दिल्ली प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे (High Alert in Delhi) .
जम्मू-काश्मीर येथून चार ते पाच अतिरेकी एका ट्रकने दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. मात्र, ही माहिती उघड झाल्याने अतिरेकी बस, कार किंना टॅक्सीतून प्रवास करुन दिल्लीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले असून जम्मू येथून दिल्लीला येणाऱ्या सर्व गाड्यांचा तपास केला जात आहे. दिल्लीत अनेक नाक्यांवर गाड्यांची चेकींग केली जात आहे. याशिवाय दिल्लीतील अनेक गाड्यांचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिल्लीतील सर्व हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये देखील तपास करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील सर्व बस स्थानक, रेल्वे स्टेशनवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील सर्व पोलीस उपायुक्त, स्पेशल क्राईम ब्रांचसह इतर सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. राज्याच्या सीमावर्ती भागात विशेष तपास केला जात आहे.