मुंबई : देशभरात सध्या लॉकडाऊन (Lock Down in India) म्हणजेच संचारबंदी आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग न व्हावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असं आवाहन अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत (Lock Down in India). याशिवाय अनेक सेलिब्रेटी लॉकडाऊन दरम्यान आपला वेळ कसा घालवत आहेत, याबाबत नागरिकांना सांगत आहेत.
बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनी लॉकडाऊनमुळे स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. दररोज धावपळ, काम, शूटिंग यामुळे त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता येत नाही. मात्र, सर्वांना सध्या कुटुंबासाठी वेळ देता येत असल्याचे ते सांगत आहेत. याशिवाय अनेकांनी आपली कला, छंद जोपासायला वेळ मिळाला असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या घरात राहून आपल्या चित्रकलेचा छंद जोपासत आहे. त्याने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत सलमान चित्र काढताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रणिती चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रणिती ‘तू ही रे’ गाणं गाताना दिसत आहे. या गाण्यासोबत तिने आपले मित्र आयुष्मान खुराना, आलिया भट आणि श्रद्धा कपूर यांना अंताक्षरी खेळण्यासाठी चॅलेंज दिलं आहे. तिने तिघांना ‘त’ पासून सुरु होणाऱ्या गाण्याचं चॅलेंज दिलं आहे.
दुसरीकडे अनुपम खेर यांनीदेखील ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते ‘जीना इसी का नाम है’ हे गाणं बोलताना दिसत आहेत.
Here are the positive #SideEffects of my #SelfQuarantine. My first ever try at #Karaoke with my fav song. Ignore the voice and the singing. Just focus on the joy and the passion behind the attempt. जज़्बात पर जाइए आवाज़ पे नहीं। ??? #StayAtHome #BeCreative #EntertainYourself pic.twitter.com/gcbxIhCwZb
— Anupam Kher (@AnupamPKher) March 24, 2020
आयुष्मान खुरानानेदेखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने कविता लिहायला आवडत असल्याचं सांगितलं. यावेळी त्याने कवियत्री पल्लवी त्रिवेदी यांची कविता वाचली.
अभिनेत्री मलायका अरोरादेखील सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी ती स्वयंपाक करताना दिसली. आपल्याला स्वयंपाक करायला खूप आवडतं, असं ती म्हणाली आहे.
आलिया भटने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत घरी राहून पुस्तक वाचा, असा संदेश तिने दिला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊननुसार देशातील कोणत्याही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. मात्र, अत्यावश्यक सुविधा सुरु राहणार आहेत.