मुंबई : जगभरातील जवळपास 210 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लसीची वाट बघत आहे. देशात कोवॅक्सिन (Covaxin), जायकोव-डी (ZYcov-D), कोविशील्ड (Covishield) सारख्या आणखी काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, आता एक नवं आव्हान उभं राहत आहे, ते आव्हान म्हणजे कोरोनाच्या पुन्हा संसर्गाचं! (How many chances of COVID 19 reinfection)
कोरोनावर एकदा मात केल्यानंतर पुन्हा संसर्ग होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनावर मात केल्यावर शरीरात अँटीबॉडी असताना पुन्हा संसर्ग कसा होत असेल? समजा, कोरोनावर लस जरी आली तरी त्या लसीचा तात्पुरता फरक पडेल का? लस तयार झाल्यानंतरही जगावर कोरोनाचं संकट तसंच राहील का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत.
कोरोना मात केल्यानंतर पुन्हा संसर्गाची पहिली केस चीनच्या हाँगकॉंग शहरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळली होती. एका 33 वर्षीय युवकाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. त्याआधी त्याला मार्च महिन्यात संसर्ग झाला होता. कोरोनाच्या पुन्हा संसर्गाची ही जगातील पहिली केस होती. त्यामुळे अनेक संशोधकांनी या केसकडे लक्ष दिलं.
काही संशोधकांनी त्यावेळी पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भारतासह अनेक देशांमध्ये पुन्हा संसर्गाच्या काही केसेस समोर येत आहेत. यावर वैज्ञानिकांचं संशोधन सुरु आहे. दरम्यान, जे रुग्ण पूर्णपणे बरे होत नाहीत त्यांना पुन्हा संसर्गाचा धोका असतो, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे.
भारतात पुन्हा संसर्गाच्या किती केसेस?
भारतातही गेल्या काही दिवसात कोरोनाच्या पुन्हा संसर्गाच्या काही केसेस समोर आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माहितीनुसार, भारतात गेल्या काही दिवसात 3 अशाप्रकारचे केसेस आढळल्या आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाला 100 दिवसात पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचं आयसीएमआरचे संचालन बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.
“जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही व्यक्ती 90, 100 किंवा 120 दिवसानंतर पु्न्हा संक्रमित होऊ शकेल, अशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही 100 दिवसांची सीमा ठेवली आहे. एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला 100 दिवसात कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेकडून याबाबतची माहिती आम्हाला मिळाली आहे”, असं बलराम भार्गव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
शरीरात किती दिवस अँटीबॉडी राहते?
हाँगकाँगमध्ये पुन्हा संसर्गाची पहिली केस समोर आली होती. संबंधित रुग्णाच्या शरीरात चार महिन्यात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडी संपल्या होत्या. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाच्या शरीरात चार महिने अँटीबॉडी असतात, अशी माहिती संशोधनातून समोर आल्याचं आयसीएमकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात तीन ते पाच आठवड्यांपूर्वी संक्रमित झालेल्या 90 टक्के लोकांमध्ये 38.8 टक्के अँटीबॉडी होती.
अंमेरिकेच्या एरिजोना विद्यापीठाने केलेल्या संशोधनात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर योग्य उपचार घेतल्यास शरीरात पुढचे पाच महिने कोरोनाविरोधात लढणारी रोगप्रतिकार क्षमता तयार झालेली असते, अशी माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे या संशोधनासाठी संशोधकांनी जवळपास 6 हजार पेक्षा जास्त लोकांचे टेस्ट केल्या होत्या.
लस आल्यानंतरही कोरोनाचं संकट कायम राहील?
कोरोनाची लस आल्यानंतर जगावरील कोरोनाचं संकट लवकर दूर होईल, अशी आशा आहे. मात्र, लसीतून देण्यात आलेली अँटीबॉडी किती दिवस शरीरात राहील? असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान येल विद्यापीठाच्या इवासका या संशोधकाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. लसीमुळे कोरोनातून रुग्ण बरे होतील. पण लसीमुळे पुन्हा होण्याऱ्या संसर्गास रोखता येईल का? हे सध्या सांगता येणार नाही, असं संशोधकाने सांगितलं आहे.
कोरोनावर अशा एका लसीची गरज आहे जी शरीरातील अँटीबॉडी थांबवेल याशिवाय पुन्हा होणाऱ्या संसर्गालाही थांबवेल, असं इवासका यांनी सांगितलं.
भारतात कोरोनाच्या पुन्हा संसर्गाचा वेळ 100 दिवस
कोरोनाच्या पुन्हा संसर्गाच्या केसेस आतापर्यंत जास्त आलेल्या नाहीत. दरम्यान, आयसीएमआरने 100 दिवसांची सीमा सांगितली आहे. एखाद्या व्यक्तीला 100 दिवसानंतर पुन्हा संसर्ग झाल्यास त्याला नवा कोरोनाबाधित मानलं जाईल.
दरम्यान, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर ए. के. वार्ष्णेय यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं होतं. “अनेकदा असं होतं की, विषाणू आपलं रुप बदलून येतो. अशावेळी अँटीबॉडीदेखील प्रभावी ठरत नाहीत”, असं ते म्हणाले होते. “कोरोनाचा संसर्ग हा नाक किंवा तोंडातून टेस्ट केल्यानंतर समजतो. मात्र, अनेकदा फुफ्फुसात विषाणू काही अंश जिवंत राहतो. त्यामुळे काही दिवसांनी हा विषाणू पुन्हा प्रभावी ठरु शकतो”, असं ते म्हणाले होते.
“दरम्यान, कोरोनाच्या पुन्हा संसर्गाचे केसेस सध्या फार कमी आहेत. त्यामुळे या केसेसच्या आधारावर निष्कर्ष ठरवणं योग्य नाही. त्यामुळे यावर संशोधन सुरु आहे”, असं डॉक्टर वार्ष्णेय यांनी सांगितलं आहे (How many chances of COVID 19 reinfection).
(टीप : संबंधित माहिती ही तज्ज्ञांच्या मते मांडण्यात आले आहेत. या विषयात सध्या अजून संशोधन सुरु आहे)
संबंधित बातम्या :
देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश