हैदराबाद: एका रुग्णवाहिकेला रस्ता करुन देण्यासाठी हैदराबादमध्ये एका वाहतूक पोलिसाने केलेली कामगिरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी हा वाहतूक पोलीस कर्मचारी दोन किलोमीटर अंतर धावत गेला. (Hyederabad constable ran two kilometre traffic jam)
प्राथमिक माहितीनुसार, हैदराबादच्या बँक स्ट्रीट परिसरात मंगळवारी एक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली होती. रुग्णाचा जीव वाचण्यासाठी ही रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचणे आवश्यक होते. रुग्णवाहिकेचा चालक मार्ग काढण्यासाठी बरेच प्रयत्न करत होता. मात्र, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका फार पुढे जाऊ शकत नव्हती.
HTP officer Babji of Abids Traffic PS clearing the way for ambulance..Well done..HTP in the service of citizens..@HYDTP pic.twitter.com/vFynLl7VVK
— Anil Kumar IPS (@AddlCPTrHyd) November 4, 2020
त्यावेळी या परिसरात ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल जी. बाबाजी यांनी या रुग्णवाहिकेला रस्ता काढून देण्यासाठी धावत धावत वाहनांना बाजुला करायला सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ही रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून अखेर बाहेर पडली. या रुग्णावाहिकेला रस्ता करुन देण्यासाठी कॉन्स्टेबल जी. बाबाजी हे जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत धावत होते. रुग्णवाहिकेच्या पुढे धावताना ते वाहनांना बाजूला सारण्याचे काम करत होते. त्यामुळेच रुग्णावाहिकेला पुढे जात राहण्यासाठी रस्ता मिळत राहिला.
एका वाहनचालकाने कॉन्स्टेबल जी. बाबाजी यांचा व्हिडीओ काढला. सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जी. बालाजी यांच्या कामगिरीचे सामान्यांकडून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे जी. बाबाजी यांनी रुग्णवाहिकेला मार्ग काढून दिल्यानंतर रस्त्यावरील लोकांनीही त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. बऱ्याच वाहनचालकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यावेळी मला खूप समाधानी वाटल्याचे त्यांनी सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरस झाल्यामुळे स्थानिक प्रशासनानेही त्यांच्या या कामगिरीची दखल घेतली. या कामगिरीबद्दल हैदराबादच्या पोलीस आयुक्तांकडून जी. बाबाजी यांचा सत्कार करण्यात आला.
(Hyederabad constable ran two kilometre traffic jam)