लडाख : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि नौदलाकडून पूर्व लडाखमध्ये सीमाभागात आकाश क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत (India deploys Akash missiles in Ladakh). याआधी सीमाभागात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आता क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. भारताकडून चिनी विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे (India deploys Akash missiles in Ladakh).
चिनी विमानांच्या प्रत्यक्ष सीमारेषा भागात घिरट्या सुरु आहेत. त्याच विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारताकडून ‘आकाश’ क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुखोईसारखे लढाऊ विमानेदेखील तैनात करण्यात आले आहेत. याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : दोस्त असावा तर असा! भारत-रशिया मैत्रीची रंजक कहाणी
सध्या भारत-चीन युद्ध होणार नसलं तरी युद्धसदृश्य परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनची कमांडिंग स्थरावर बैठक झाली होती. चीनने आपण सैन्य माघारी घेऊ, असं मान्य केलं होतं. मात्र, चीनने तसं केलं नाही. याउलट सीमाभागात चिनी सैन्याचे क्षेपणास्त्रांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चीनने त्याभागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करायला सुरुवात केली आहे, असं शैलेंद्र देवळेकर यांनी सांगितलं.
चीनकडून नवे दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत आपण लष्करीदृष्टीने सज्ज राहावं. कारण चीन कोणत्या क्षणी धोका देईल, हे सांगता येत नाही. चीन सीमेवर आपल्या लष्करी सेनेचं प्रदर्शन करत असल्याने आपल्याला जशास तसे उत्तर देणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताकडून सीमाभागात क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले. सध्या युद्ध होणार नाही. मात्र, लष्करी क्षमतेचं प्रदर्शन दोन्ही देशांकडून केलं जात आहे, असं शैलेंद्र देवळेकर म्हणाले.
चीनची आक्रमकता फक्त भारताच्या सीमेभागात वाढलेली नाही, तर दक्षिण चीन समुद्रातही व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. चीनच्या आक्रमकतेविरोधात अमेरिकेने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. अमेरिका युरोपमधील त्यांचं सैन्य आशिया खंडात तैनात करणार आहे. चीनच्या विस्तारवादाला बळी पडलेले जे देश आहेत, यामध्ये जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, तैवान या सर्वांना एक प्रकारचं मानसिक समर्थन अमेरिकेकडून मिळालं आहे, असंदेखील शैलेंद्र देवळेकर म्हणाले.